अडीच वर्षाच्या चिमुकलीसह दाम्पत्यानं रेल्वेखाली दिलं झोकून, आई आणि मुलीचा जागीच मृत्यू

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामध्ये एका दाम्पत्याने आपल्या अडीच वर्षाच्या चिमुकलीसह रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत मुलगी आणि आई गंभीर जखमी झाल्याने त्यांचा यामध्ये मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना साकेगाव शिवारात घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हरिश शिरीष चौधरी (वय-36 रा. साकेगाव) असे जखमी झालेल्या पतीचे नाव आहे.

साकेगाव येथील हरीश चौधरी यांनी आपल्या अडीच वर्षाच्या मुलीसह रेल्वेखाली झोकून देत आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांची पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला असून हरिष यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरीश यांच्यावर डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेजच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. या परिसरातून जाणाऱ्या लोकांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी तातडीने याची माहिती गावातील लोकांना दिली. गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या हरीश यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन पोलिसांना घटनेची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिला आणि तिच्या अडीच वर्षाच्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. हरीश यांनी आपल्या कुटुंबासह आत्महत्येचा प्रयत्न का केला हे अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.