Coronavirus : ‘कोरोना’च्या टेस्ट करण्यात भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर, आरोग्य मंत्रालयाची माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोनाचे रुग्ण जगभरासह देशात वाढतच आहेत. दिवसेंदिवस हजारो नवीन रुग्णांना कोरोनाचे निदान होत आहे. तरी देखील काही दिवसांपूर्वी केंद्र सरकार कोरोनाच्या टेस्ट कमी करत आहे अशी टीका विरोधकांकडून केली जात होती.

गुरुवारी झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत जाहीर झालेली कोरोना टेस्टची संख्या दिलासादायक आहे असं दिसून येतं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची देशातील वाढत्या कोरोनाव्हायरसविषयी आज पत्रकार परिषद झाली. या वेळी आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भुषण, सहसचिव लव अग्रवाल तसेच आयसीएमआरचे डीजी डॉ. बलराम भार्गव उपस्थित होते. राजेश भूषण यांनी सांगितले की, भारत जगात कोरोनाच्या टेस्ट घेण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, मागील 24 तासांत भारतात 11.72 लाख कोरोना टेस्ट झाल्या आहेत. आतापर्यंतची एक दिवसातील ही सर्वाधिक आकडेवारी ठरली आहे. तर आतापर्यंत भारतात कोरोनाच्या 4,55,09,380 टेस्ट झाल्या आहेत.

कोरोनाव्हायरसच्या बाधित राज्यांविषयी माहिती देताना पहिल्या पाच राज्यांतच 62 टक्के रुग्ण आहेत. तसेच महाराष्ट्रात सर्वात जास्त 24.77 टक्के आणि आंध्र प्रदेशात 12.64 टक्के कोरोना रुग्ण आहेत. कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश ही राज्ये अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. जर आपण मागील एका आठवड्याचा विचार केला तर या राज्यांत कोरोनाच्या सक्रिय केसेसही कमी होत असल्याचे दिसत आहे, अशी माहिती भूषण यांनी सांगितली.

देशातील महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि आंध्र प्रदेशा या पाच राज्यात कोरोनाने होणाऱ्या मृत्यूची संख्या सर्वाधिक आहे. एकूण मृत्यूंपैकी 70% मृत्यू ह्या 5 राज्यांमधील आहेत. मागील इजा आठवड्याचा विचार केला तर आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे आणि दिल्ली आणि कर्नाटकमध्ये त्याची वाढ झाल्याची माहितीही भूषण कुमार यांनी दिली आहे.