इस्त्रायल कंपनीने तयार केला Miracle मास्क, 99 % ‘कोरोना’ व्हायरसचा करतो ‘खात्मा’

जेरुसलेम : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग चिंताग्रस्त आहे. व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात संशोधन सुरु आहेत. जगातील 190 देशांपेक्षा जास्त देशांना कोरोना विषाणूचा फटका बसला आहे. मात्र यावर रामबाण औषध अद्याप उपलब्ध झालेले नाही. मात्र, व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी अनेक गोष्टी आता बाजारात येत आहेत. इस्त्राईलच्या sonovia या कंपनीने हा खास मास्क तयार केला असून हा मास्क 99 टक्के कोरोना व्हायरसचा खात्मा करतो असा दावा कंपनीने केला आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

इस्त्रायलच्या sonovia या कंपनीने खास फॅब्रिकपासून हा मास्क तयार केला आहे. यावर Zinc Oxide nano-particles चं कोटिंग करण्यात आलेलं आहे. या कोटिंगमुळे 99 टक्के बॅक्टेरिया आणि व्हायरस निष्क्रिय होतात असा दावा या कंपनीने केला आहे. चीनच्या शांघाई मधल्या Microspectrum लॅबमध्ये या मास्कचं परिक्षण करण्यात आलं आहे. या मास्कमुळे 90 टक्क्यांपेक्षा जास्त व्हायरस निष्क्रिय होतात असं म्हटलं आहे.

कंपनीच्या तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख लीट गोल्डामर यांनी असा दावा केला आहे की, हॉस्पिटलमध्येही विविध उपकरणांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे 99 टक्के व्हायरसपासून बचाव केला जाऊ शकतो. मास्कमुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश येतं हे आता सिद्ध झालं असून अनेक देशांमध्ये घराबाहेर पडताना मास्क वापरणं सक्तिचं करण्यात आलेलं आहे.