Coronavirus : सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील ‘या’ सरकारी रुग्णालयात ‘कोरोना’ चाचणी व उपचार ‘मोफत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व चाचण्या व उपचाराबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या सर्व चाचण्या आणि उपचार निशुल्क करण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी दिली. राज्यातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारितील शासकीय वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालयांमध्ये व रुग्णालयामध्ये या संदर्भातील चचण्या व उपचार मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेकडून कोविड-19 प्रादुर्भावास जागतिक साथरोग घोषित करण्यात आले आहे. राज्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारितील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय व रुग्णालयामध्ये कोविड -19 संदर्भातील रुग्णांच्या सर्व तपासण्या व उपचार यापुढे नि:शुल्क करण्यात आले आहेत, असे देशमुख यांनी नमूद केले.

कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचारासाठी अधिक पैसे लागतील, या भीतीपोटी अनेक रुग्ण आपला आजार लपवतात, असा अनुभव आहे. या निर्णयामुळे अधिकाधिक रुग्ण पुढे येऊन स्वत:वर उपचार करून घेतील या निर्णयामुळे अधिकाधिक चाचण्या घेणे शक्य होणार असल्याने कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल, असेही अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.