ना कोणती बातमी, ना फोटो : न्यूयॉर्क टाइम्सनं वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर छापली ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडलेल्या 1 लाख अमेरिकन नागरिकांची नावे

न्यूयॉर्क : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा प्रकोप सुरू आहे, सुमारे 3.43 लाख लोकांचा कोविड-19 मुळे जीव गेला आहे. या दरम्यान, अमेरिकेतील एक प्रमुख दैनिक असलेल्या न्यूयॉर्क टाइम्सने आज एका आनोख्या पद्धतीने कोरोना व्हायरसचे गांभिर्य दाखवून देत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने वृत्तपत्राचे पहिले पान पूर्णपणे कोरोना व्हायरसच्या महामारीत जीव गमावणार्‍या अमेरिकनांना समर्पित केले आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर केवळ कोरोना व्हायरसने जीव गमावणार्‍या सुमारे एक लाख लोकांची नावे छापली आहेत. आज पहिल्या पानावर ना कोणती बातमी आहे, ना जाहिरात, ना छायाचित्र. पहिल्या पानावर कोविड-19 ने प्राण गमावणार्‍यांच्या नावाची पूर्ण यादी आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरसने मरणार्‍यांची संख्या सुमारे 1 लाखावर पोहचली आहे आणि आतापर्यंत 16 लाखांपेक्षा जास्त कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह केसेस आढळल्या आहेत.

न्यूयॉर्क टाइम्सने पहिल्या पानावर केवळ एक हेडिंग आणि डिस्क्रिप्शन दिले आहे – यूएस डेथ नियर 100,000, अ‍ॅण्ड इनकॅलक्युलेबल लॉस, म्हणजे अमेरिकेत सुमारे एक लाख मृत्यू, अमर्याद नुकसान. डिस्क्रिप्शनमध्ये त्याच पानावर डाव्या बाजूस लिहिले आहे -दे वेअर नॉट सिम्पली नेम्स इन अ लिस्ट, दे वेअर अस’ म्हणजे या यादीत ती फक्त नावे नाहीत, ते आपण आहोत.

असोसिएट प्रेसनुसार, ग्राफिक्स डेस्कचे सहायक संपादक सिमोन लॅडन यांनी म्हटले की, मरण पावलेल्या लोकांच्या जीवनाची विशालता आणि विविधता व्यक्त करणे आणि ते आमच्यासाठी काय होते, हे दर्शवण्यासाठी आम्ही सामान्य लेख, फोटो आणि ग्राफिक्सऐवजी त्यांच्या नावाची यादी छापली आहे.