Coronavirus Vaccine : ‘कोरोना’ लशीच्या वितरणाची Blue print तयार, Election Commission ची मदत घेणार सरकार

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनावर मात करण्यासाठी देशात काही लशीचे (coronavirus vaccine) उत्पादन सुरु आहे. येत्या एक किंवा दोन महिन्यात देशातील नागरिकांना लस उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लशीच्या वितरणासाठीची जोरदार तयारी सुरू केली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील लशीचा डोस मिळावा यासाठी केंद्र सरकार निवडणूक आयोगाची (Election Commission) मदत घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

कोरोना लशीच्या वितरणासाठी रणनिती तयार केली जात आहे. देशातील नागरिकांना त्यांच्या वयोमानानुसार वेगवेगळ्या टप्प्यात लस दिली जाणार आहे. अशावेळी निवडणूक आयोगाकडे देशातील मतदारांची चोख माहिती उपलब्ध आहे. या माहितीच्या माध्यमातून लस वाटपाचे अभियान राबविण्यात येणार आहे. इतकेच नव्हे, तर सरकार बुथ पातळीवरील अधिकाऱ्यांचीही मदत घेण्याचा विचार करत आहे. जेणेकरुन घराघरापर्यंत पोहोचता येईल. निती आयोगाकडून या संदर्भात एक सविस्तर प्रस्ताव तयार केला जात आहे. निवडणूक आयोगाशी चर्चा करुन याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत कोरोना लशीची माहिती दिली होती. त्यानंतर सर्वपक्षीय बैठकीचे देखील आयोजन केले होते. राज्यांनी त्यांच्याकडील कोल्ड स्टोरेजच्या सुविधेची तयारी करुन ठेवावी आणि सविस्तर अहवाल केंद्राकडे पाठवावा, असे मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. सर्वपक्षीय बैठकीत मोदींनी येत्या काही आठवड्यांत लस उपलब्ध होऊ शकते, असेही पंतप्रधान मोदीनी यावेळी सांगितले होते. दरम्यान सध्या देशात आठ वेगवेगळ्या लशींची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू आहे. यातील तीन लशी देशांतर्गत तयार केल्या जात आहेत.