BCCI चे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरभ गांगुलीच्या घरात ‘कोरोना’चा शिरकाव, भाऊ-वहिनीसह चौघे पॉझिटिव्ह

दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून नेते, राजकारणी, अधिकारी यांच्यानंतर आता खेळाडूंच्या घरात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीच्या परिवारातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सौरभ गांगुलीचा मोठा भाऊ आणि त्याच्या घरातल्या चार जाणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सौरभ गांगुलीचे मोठे बंधू स्नेहाशीष गांगुली हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांच्या पत्नीला देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एका वृत्तानुसार या दोघांनाही एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथून त्यांना कदाचित डिस्चार्ज मिळू शकतो.

स्नेाहाशीष गांगुली यांचे सासू-सासरे गेल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. त्यानंतर घरातल्या इतरांनाही लक्षणं जाणवू लागली होती. सौरभ गांगुलीचा आपल्या भावाशी गेल्या आठवड्यापासून थेट संपर्क आला असण्याची शक्यता कमी आहे. कारण सौरभ गांगुली हे दुसऱ्या घरात रहात होते. पण तरीही बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांचे कुटुंबीयसुद्धा अधिक काळजी घेत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.