IND VS ENG : रोहित शर्मानं सुनील गावस्करला टाकलं मागे, करून दाखवला ‘हा’ पराक्रम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   रोहित शर्मा (Rohit Sharma) ने दुसर्‍या कसोटीत इंग्लंडविरुद्ध 161 धावांची शानदार खेळी केली. कसोटीत चौथ्यांदा त्याने 150 हून अधिक धावा केल्या. कसोटीतील हे त्याचे 7 वे शतक आहे. सलामीवीर म्हणून रोहितचे हे तिन्ही फॉर्मेट (टेस्ट, वनडे, टी20) मध्ये 35 वे शतक आहे. त्यापैकी कसोटीत 4, एकदिवसीय सामन्यात 27 आणि टी-20 मध्ये 4 शतक आहेत. रोहित टी-20 मध्ये भारतीय सलामीवीर म्हणून शतक झळकावणारा एकमेव फलंदाज देखील आहे.

रोहितने भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांना मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी 34 शतके केली आहेत. गावस्करने सलामीवीर म्हणून कसोटीत 33 तर वनडेमध्ये एक शतक झळकावले आहे. तथापि त्यांच्या काळात टी-20 सामने होत नव्हते.

सचिन-सेहवागच्या मागे आहे रोहित

रोहित आता फक्त सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागच्या मागे आहे. सचिन तेंडुलकरने तिन्ही फॉर्मेटमध्ये 45 तर सेहवागने 36 शतके केली आहेत. सचिनने हे काम 346 सामन्यात तर सेहवागने 321 सामन्यात केले. दुसरीकडे रोहितने हे फक्त 225 सामन्यांत केले आहे. सरासरीच्या बाबतीत रोहित सचिन आणि सेहवागपेक्षा पुढे आहे. रोहितची सरासरी 50 च्या वर आहे. सचिनने हे 48 तर सेहवागने 42 च्या सरासरीने असे केले आहे.