IND vs SA : धर्मशाळा वन-डे रद्द, एकही चेंडू न फेकल्यानं 6 महिन्यापुर्वीच्या इतिहासाची पुर्नरावृत्ती, बनले ‘हे’ 3 योग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. हा सामना धर्मशाळा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता, परंतु सततच्या पावसामुळे सामन्याचा टॉस सुद्धा होऊ शकला नाही आणि अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे एकही चेंडू न फेकता या मैदानावर सहा महिन्यांच्या जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली.

इंडियन प्रीमियर लीग सुरू होण्याआधी भारतीय संघाची ही शेवटची मालिका आहे. मालिकेचे उर्वरित दोन सामने लखनऊ आणि कोलकाता येथे खेळले जाणार आहेत. मात्र, धर्मशाळेत रद्द झालेल्या सामन्यात तीन योगायोग झाले. जाणून घेऊया…

१) सलग दुसरा आंतरराष्ट्रीय सामना पावसामुळं रद्द
हे दुसऱ्यांदा घडत आहे की धर्मशाळेच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना हा पावसामुळं रद्द झाला. मागील वर्षी १५ सप्टेंबर रोजी देखील एक आंतरराष्ट्रीय टी २० सामन्याला पावसामुळं रद्द करण्यात आले होते.

२) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचे कनेक्शन
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की १५ सप्टेंबर २०१९ रोजी धर्मशाळा येथे जो आंतरराष्ट्रीय टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता, तो सामना या दोन संघांमध्ये म्हणजेच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातच होणार होता. यावेळीसुद्धा भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ पावसाचे बळी ठरले आहेत.

३) मालिकेचा पहिला सामना
पावसामुळे रद्द झालेल्या या सामन्यातील तिसरा योगायोगही खूप खास आहे. वास्तविक, मागील वर्षी रद्द केलेला टी-२० सामना हा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना होता. या वेळी धर्मशाळेत रद्द करण्यात आलेला एकदिवसीय सामनाही या दोन्ही संघांमधील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिलाच सामना होता.

लखनऊ मध्ये भिडणार दोन्ही संघ
धर्मशाळेतील पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाल्यावर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यानचा दुसरा सामना लखनऊमध्ये होणार आहे. उत्तर प्रदेशच्या राजधानीत इकाना स्टेडियमवर रविवारी १५ मार्च रोजी मालिकेच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघांचा सामना होईल. यानंतर, बुधवारी १८ मार्च रोजी मालिकेचा तिसरा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर होईल. बीसीसीआयच्या सूत्रांकडून माहिती समोर येत आहे की, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उर्वरित दोन सामने हे रिकाम्या स्टेडियमवर खेळली जाण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी असा निर्णय घेतला जात असल्याचे पुढे येत आहे.