पत्नी नांदायला येत नसल्याने संतापलेल्या पतीने चक्क घराला लावली आग, 7 जण होरपळले

कानपूर : वृत्तसंस्था – पत्नी नांदायला येत नाही म्हणून संतापलेल्या पतीने चक्क तिच्या माहेरी जात घराला आग लावल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. या घटनेत 7 जण होरपळे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील तीन जणांचा प्रकृती अत्यंत गंभीर आहे. कानपूर जिल्ल्ह्यात शुक्रवारी (दि. 15 ) ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूर जिल्ह्यातील हरदोईचा रहिवासी असलेल्या मुकेशसोबत मनिषाचे लग्न झाले आहे. मुकेश आणि मनिषाला एक महिन्याचा मुलगा देखील आहे. मात्र पतीकडून वारंवार होणाऱ्या मारहाणीला कंटाळून मनिषा मुलासह आपल्या माहेरी राहायला आली होती. जावाई मुलीला सारखा त्रास देत असल्याने तिचे वडील हिरालाल देखील त्याला कंटाळले होते. त्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांनी मुलीला तिच्या सासरी जायच असल्यास पाठवून द्या किंवा तिला जायचं नसल्यास पाठवू नका असा सल्ला त्यांना दिला होता. त्यामुळे मनिषा माहेरीच होती.

शुक्रवारी पहाटे चार वाजता मुकेश मनिषाच्या माहेरी पोहचला. त्याने दरवाजा उघडण्यासाठी आरडा-ओरडा केला. दरवाजा न उघडल्याने त्याने बाहेरच शिवीगाळ करायला सुरुवात केली. दरम्यान त्याने घराच्या चारही बाजुंना पेट्रोल टाकून आग लावली. आग लागल्याचे पाहून घरात असलेल्या मंडळींनी मदतीसाठी आरडाओरडा केला, शेजाऱ्यांकडे मदत मागितली. घराबाहेर येईपर्यंत सात जण होरपळले. शेजाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.