देशातील मंदिरे, मशीदींमध्ये भाविकांची गर्दी तर राज्यातील मंदिरे बंदच

नवी दिल्ली : वृत्त संस्था – लॉकडाऊन ५ मधील अनलॉकचा तिसरा टप्पा आजपासून सुरु झाला असून त्यात मंदिरे, मशीद, प्राथर्नास्थळे सुरु करण्यात आली आहे. देशभरातील अनेक शहरांमधील प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी येण्यास सुरुवात केली आहे. तब्बल ७२ दिवसांनंतर मंदिरांची दारे भक्तांसाठी उघडली आहेत़ तर अनेक मशीदीमध्ये भाविकांनी आज सकाळी सोशल डिस्टन्सिंग पाळून नमाज अदा केली.

केंद्र सरकारने मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारा खुले करण्यास परवानगी दिली असली तरी महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने ३० जूनपर्यंत मंदिरे, प्राथर्नास्थळे उघडण्यावर बंदी घातली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी गोरखनाथ मंदिरात आज सकाळी जाऊन प्रार्थना केली. उत्तर प्रदेशातील बहुतांशी प्रसिद्ध मंदिरे आजपासून दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत.
दिल्लीमध्ये आजपासून अनलॉकचा तिसरा टप्पा सुरु झाला. प्रसिद्ध जामा मशीदीत मुस्लिम बांधवांनी आज सकाळी नमाज अदा केली. गुरुद्वारांमध्येही शिख नागरिक दर्शनासाठी येऊ लागले होते.

बंगळुरु येथील बसवणगुडी येथील श्री दोडा गणपती मंदिर आज संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर आजपासून दर्शनासाठी खुले करण्यात आले. तेथे सकाळपासूनच भाविकांची मोठी रांग पहायला मिळत आहे.
देशातील सर्वच महत्वाच्या धार्मिक स्थळांवर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली दिसून येत होती.
केंद्र सरकारने आखलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, मास्क घातल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. तसेच आत आल्यावर हाताला सॅनिटायझर लावल्यावरच पुढे जाऊन दिले जात होते.