हल्ल्यानंतर सीआरपीएफचा अहवाल सादर; धक्कादायक माहिती उघड   

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये झालेल्या हल्ल्याचा अहवाल हा सीआरपीएफने गृहमंत्रालयाकडे सोपवला आहे. या अहवालात धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात स्थानिकांची मदत आहे, अशी माहिती या अहवालात देण्यात आली.

एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके स्थानिक मदतीशिवाय शहरात आणणं दहशतवाद्यांना शक्य नाही, असा खुलासा सीआरपीएफच्या अहवालात करण्यात आला आहे. ‘गेल्या १५ दिवसांमध्ये ३ वेळा सीआरपीएफचा ताफा हलवला’ असल्याचंही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

स्थानिकांच्या मदतीने हल्ले घडवण्यात येत असल्याचे या अहवालात सीआरपीएफकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कारण; काश्मीरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांची ने-आण करण्यासाठी परवाणगी नाही. तरी गाड्यांची अदला-बदल, स्फोटकांचा एवढा साठा यासाठी स्थानिक पातळीवर परवाना लागतो. तो कसा देण्यात आला, असा संशय आता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, ज्यापद्धतीने हा हल्ला झाला त्याप्रमाणे या सगळ्याला स्थानिकांची मदत आहे. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच दहशतवाद्यांकडून अशा प्रकारे ‘वाहनांवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे’ असे या अहवालात मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी केंद्र सरकारने लगेचच पाऊलं उचलावी, असंही या अहवालात म्हटलं आहे.