दरोडेखोरांचा तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला ; ५ गंभीर जखमी

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदपूर तालुक्याजवळ असलेल्या लांजी शिवारात आखाड्यावर सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी दोन महिला तर तीन पुरुषांवर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ल केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक असून सर्व जखमींवर लातूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

अहमदपूर तालुक्यातील लांजी शिवारात अहमदपूर-अंबाजोगाई रोडवर बाबूराव केंद्रे व एजाज सय्यद यांचा आखाडा असून तेथे सशस्त्र दरोडा पडला. या दरोड्यात बाबूराव संभाजी केंद्रे (६५), रूक्मीण बाबूराव केंद्रे (६२) यांच्या आखाड्यावर कत्ती, लोखंडी रॉडने हल्ला केला. यात रूक्मीण केंद्रे या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर हाकेच्या अंतरावर असलेल्या एजाज सय्यद यांचे पोल्ट्री फॉर्म असून वळसंगी येथील रहिवासी व पोल्ट्री फॉर्मवर काम करणारे कामगार चैनखा बक्षू पठाण (५५), सद्दाम चैनखा पठाण (३२), रेश्मा चैनखाँ पठाण (५०) यांच्यावर हल्ला करून जखमी केले. या दरोडयात तीन मोबाईल, दागदागिने, होन्डा कंपनीची मोटारसायकल यांच्यासह १ लाख १८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.

या घटनास्थळाला अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, उपाधीक्षक प्रिया पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी शेलार, पोलीस निरीक्षक नागरगोजे, फौजदार गित्ते, सांगवीकर यांनी भेट दिली. हयात उर्फ सद्दाम चैनखाँ पठाण यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.