पोलिस महासंचालक दत्‍ता पडसलगीकर यांना मुदतवाढ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्य पोलिस दलाचे पोलिस महासंचालक दत्‍ता पडसलगीकर हे सेवाज्येष्ठतेनुसार ऑगस्ट अखेरीस निवृत्‍त होणार असले तरी त्यांना राज्य सरकार मुदतवाढ देणार असल्याची माहिती गृह विभागाच्या विश्‍वसनीय सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, पडसलगीकर यांना 3-3 महिन्यांची अशी एकुण 6 महिन्यांची मुदतवाढ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता फेब्रुवारी 2019 अखेर पर्यंत पडसलगीकर हेच पोलिस महासंचालक म्हणुन कार्यरत राहणार आहेत.

पडसलगीकर यांची जवळपास 36 वर्षाची निष्कलंक सेवा लक्षात घेवुन राज्य सरकारच्या गृह विभागाने त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्यापही तो निर्णय जाहिर करण्यात आलेला नाही. गेल्या अनेक वर्षामध्ये पोलिस महासंचालक पदावर कार्यरत असलेल्या अधिकार्‍यास राज्य सरकारने मुदतवाढ दिली नाही. माजी पोलिस महासंचालक प्रविण दीक्षित यांना देखील मुदतवाढ मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. मात्र, ऐनवेळी त्यांना मुदतवाढ देण्यात आली नाही. किंबहुना दीक्षित यांनी मुदतवाढ मागितली नाही. दीक्षित यांच्यानंतर राज्य पोलिस दलाची धुरा वरिष्ठ आयपीएस अधिकारी सतीश माथुर यांच्याकडे सोपविण्यात आली. माथुर हे जूनअखेरीस सेवानिवृत्‍त झाले. त्यानंतर मुंबईच्या आयुक्‍तपदी कार्यरत असलेले दत्‍ता पडसलगीकर यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्‍ती करण्यात आली. पडसलगीकर हे सन 1982 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्यानंतर सेवाज्येष्ठतेमध्ये 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे पोलिस आयुक्‍त सुबोध जयस्वाल यांचा नंबर लागतो.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4d06051b-aa91-11e8-9322-313ba5e28048′]
फेब्रुवारी अखेरीस पडसलगीकर निवृत्‍त झाल्यानंतर सुबोध जयस्वाल यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्‍ती केली जाईल तर मुंबईच्या आयुक्‍तपदी सन 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संजय बर्वे यांची नियुक्‍ती होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, मुंबईच्या आयुक्‍तपदी विराजमान होण्यासाठी इतर वरिष्ठ आयपीएस अधिकारी उत्सुक आहेत. युती सरकारच्या काळात एकाही आयपीएस अधिकार्‍यास मुदतवाढ देण्यात आलेली नाही. आघाडी सरकारच्या काळात मुंबईचे माजी पोलिस आयुक्‍त धनंजय जाधव आणि माजी पोलिस महासंचालक पी.एस. पसरिचा यांना मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर एकाही अतिवरिष्ठ पोलिस अधिकार्‍यास मुदतवाढ देण्यात आल्याचे उदाहरण नाही.

PUNE : माओवाद्यांच्या थिंक टँकवर देशभरात छापे

कार्यकाल संपल्यानंतर एखाद्या अधिकार्‍यास मुदतवाढ हवी असल्यास त्यांनी संबंधित विभागाकडे आणखी काम करण्याची इच्छा असल्याचे सांगुन मुदतवाढीची मागणी करणे गरजेचे असते. सेवाज्येष्ठतेनुसार दि. 31 ऑगस्ट रोजी पडसलगीकर हे निवृत्‍त होणार आहेत. मात्र, त्यांनी मुदतवाढीसाठी अद्यापतरी इच्छा व्यक्‍त केली नसल्याची सुत्रांनी माहिती आहे. आगामी दोन-चार दिवसांमध्ये राज्य सरकार पोलिस महासंचालक पडसलगीकर यांना मुदतवाढ देण्यावर निर्णय घेवुन त्यांना मुदतवाढ देईल. मात्र, पडसलगीकर यांनी मुदतवाढीसाठी इच्छा व्यक्‍त केली नाही तर मात्र राज्य सरकारची पंचायत होणार आहे. आगामी दोन-चार दिवसामध्ये राज्य सरकार त्याबाबत निर्णय घेणार आहे.