दत्तवाडी गोळीबार प्रकरण : निलेश घायवळ टोळीतील २६ जणांची निर्दोष मुक्तता 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गजानन मारणे आणि निलेश घायवळ यांच्या टोळी युद्धातून मे २०१० मध्ये झालेल्या गोळीबारात सचीन कुडले याचा खून झाला होता. याप्रकरणात पोलिसांनी निलेश घायवळ टोळीतील २६ जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली होती. मात्र पुराव्यांअभावी पोलीस त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध करू न शकल्याने मोक्का विशेष न्यायालायने निलेश घायवळ व सचिन घायवळ यांच्यासह टोळीतील २६ जणांची निर्दोष मुक्तता केली.

दत्तवाडी येथे मे २०१० मध्ये मध्ये गजानन मारणे आणि निलेश घायवळ यांच्या टोळीयुद्धातून सचिन कुडले याचा खून करण्यात आला होता. त्यावेळी मध्यरात्री गजानन मारणे आणि निलेश घायवळ टोळीच्या सदस्यांनी  दत्तवाडीत गोळीबार करून प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर अतुल कुडले याच्या तक्रारीवरून पोलिसांनी घायवळ टोळीतील २६ जणांवर कलम १२० (ब), १४३ ते १४९ आणि मुंबई पोलीस कायदा कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या टोळीला मोक्काही लावण्यात आला होता.

हेही वाचा – प्रेमाच्या जाळ्यात ओढून लुटणारी टोळी जेरबंद 

सरकारी पक्षानुसार, ८ मे २०१० रोजी अतूल कुडले दत्तवाडी पोलीस ठाण्यात एका प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या त्याच्या अल्पवयीन १७ वर्षीय साथीदाराला भेटण्यासाठी आला होता. त्याने पोलीस ठाणे सोडल्यानंतर घायवळ टोळीतील आठ जणांनी चार दुचाकींवरून त्याचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांनी सचिन कुडलेवर गोळ्या झाडल्या. त्यात सचिन कुडलेचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा साथीदारा बालाजी कदम हा जखमी झाला होता.

त्यानंतर टोळक्याने पप्पू कुडलेच्या कारचा पाठलाग सुरु ठेवला. त्याने कार दत्तवाजी पोलीस चौकीजवळ थांबवली. परंतु तो चौकीत जाण्याच्या आधीच त्याच्यावर निलेश घायवळचा हस्तक संतोष गावडे याने गोळी झाडली. त्यात त्याच्या हाताला जखम झाली होती. गावडेने त्याच्या दिशेने धारदार शस्त्रही फेकले होते. परंतु त्यात तो बचावला. जवळपास हा थरार अर्धा तास सुरु होता. त्यानतंर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला. त्यावेळी गजानन मारणे आणि निलेश घायवळ टोळीच्या वर्चस्ववादातून हा प्रकार घडल्याचे निष्पन्न केले. तसेच त्यांच्यावर मोक्का लावला.

परंतु न्यायालयात खटला सुरु असताना सरकारी पक्षाकडून २५ साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील पोलिसांव्यतिरिक्त १७ जणांनी आपली साक्ष बददली. तर सचिन कुडलचे भाऊ प्रकरणाताली तक्रारदार अतूल  कुडलेने पोलीस ठाण्यात दिलेला जबाबापेक्षा वेगळीच कहाणी सांगितली. त्याने आपण गोळीने नाही तर खाली पडल्यामुळे जखमी झालो असल्याचे न्यायालयात सांगितले. तर साथीदारांपैकी काही जण हल्लेखोऱ्यांच्या दुचाकींचे वर्णन सांगण्यात अयशस्वी ठरले. त्यामुळे कुडले याचा खून करण्यासाठीच टोळके जमले होते. त्यांचा उद्देश खून करणे आणि दंगल घडवणे होता हे सिद्ध करण्यात पोलीस अयशस्वी ठरले. विशेष म्हणजे २६ आरोपींजवळ कुकरी, चॉपर, चाकू,  कोयते अशी हत्यारे बाळगली असतानाही त्यांच्यावर गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे विशेष न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांनी २६ जणांन निर्दोष ठरवले.

तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणात काही जणांना गोवले होते अशी चर्चा त्यावेळी झाली होती. त्यावेळी शहर गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी काही आरोपींना या गुन्ह्यात अटक केली होती. न्यायालयाने सगळ्यांची निर्दोष मुक्तता केल्याने पोलिसांनी कसा तपास केला याबाबत उलट-सुलट चर्चा होत आहे. त्यावेळी शहर गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस अधिकारी आता पुण्यात कार्यरत नाहीत.