‘लफड’ चालू असताना पकडणार्‍या सासूची दगडाने ठेचून हत्या, सुनेसह तिचा मित्र ‘गोत्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सासू नवऱ्याला आपल्या अनैतिक संबंधाबाबत सांगेल या भीतीने सुनेसह तिच्या प्रियकराने सासूची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना बोरिवली परिसरात घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच काही तासांत सून व तिच्या प्रियकराला बोरिवली पोलिसांनी अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सलुबाई लाखे (५७) असे मृत महिलेचे नाव असून, ही घटना रविवारी २५ ऑक्टोबरला बोरिवली परिसरातील गोराई रोड, महात्मा फुले झोपडपट्टीत घडली. याच परिसरातील रुम क्रमांक १२४ मध्ये सलुबाई सुनेसोबत राहत होत्या. त्यांचा मुलगा चालक असून तो कामानिमित्त बाहेरगावी असतो. सून राधा (२८) हिचे त्याच परिसरात राहणाऱ्या दीपक माने (३८) नामक व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. शनिवारी सलुबाई यांनी या दोघांना घरासमोरील बाथरुमध्ये गैरकृत्य करताना पाहिले होते.

तथापि, सासू हे सर्व नवऱ्याला सांगेल याची भीती राधाला वाटत होती. म्हणून सासूचा काटा काढण्याचा निर्णय दोघांनी घेतला. रविवारी गरबा खेळण्याच्या बहाण्याने राधाने घराचा दरवाजा उघडा ठेवून निघून गेली. नंतर माने घरी आला आणि त्याने झोपेतच सलुबाईची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवला.

दरम्यान, परिमंडळ ११ चे पोलीस उपयुक्त विशाल ठाकूर, बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपी सून राधा व तिचा प्रियकर माने याला अटक केली. त्यानंतर प्रियकर माने याने राधाच्या सांगण्यावरुन ही हत्या केल्याचे पोलिसांसमोर कबूल केले.