दौंड : स्व.आ.सुभाषअण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 18 तारखेला महाआरोग्य शिबिर

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन ( अब्बास शेख ) – स्व.आमदार सुभाषअण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 18 फेब्रुवारी 2020 रोजी बोरमलनाथ मंदिर, बोरीपार्धी (चौफुला) या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी पत्रकार परिषदेत दिली. आयोजित महाआरोग्य शिबिर हे दौंडचे आमदार राहुल कुल, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, धर्मदाय संलग्न रुग्णालये, पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना यांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात येत आहे.

चार वर्षांपासून महाआरोग्य शिबिराचे आयोजन आमदार कुल यांच्या माध्यमातून करण्यात येत असून हे पाचवे महाआरोग्य शिबिर आहे. या शिबिरामध्ये 1800 डॉक्टर व नर्सिंगस्टाफ, पॅरा मेडिकल स्टाफ असून रुग्णांना आणण्यासाठी 8 सेंटर ठेवण्यात आले आहेत. यात पुणे व मुंबईतील नामांकित चाळीसहुन अधिक रुग्णालयांचा सहभाग असणार आहे. श्रवणयंत्रे, कृत्रिम अवयव, दिव्यांग साहित्य, चष्मे आदी उपकरणांचे मोफत वाटप करण्यात येत असून या अगोदर झालेल्या शिबिरांमध्ये आजपर्यंत ३५ ते ४० हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे.

तर ५००० पेक्षा जास्त रुग्णांना उपचारांचा तसेच आर्थिक मदतीचा लाभ कुल यांनी मिळवून दिला आहे. या महाआरोग्य शिबिराद्वारे पूर्वीपेक्षाही अधिक जास्त रुग्णांना फ़ायदा मिळावा यासाठी आम्ही सर्व प्रत्नशील आहोत असे आमदार कुल यांनी सांगितले. दि. १८ फेब्रुवारी २०२० रोजी श्री क्षेत्र बोरमलनाथ मंदिर, बोरीपार्धी (चौफुला) या ठिकाणी हे शिबीर पार पडणार असून त्यासाठी नाव नोंदणीची सुविधा उपजिल्हा रुग्णालय दौंड, ग्रामीण रुग्णालय यवत, तसेच आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सर्व खाजगी हॉस्पिटल मध्ये करण्यात येणार आहे.