दाऊदच्या ‘राईट हॅन्डचा’ छोटा शकीलने पाकिस्तानात काढला काटा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा राईट हॅन्ड समजला जाणारा फारुख देवडीवाला याचा काटा छोटा शकीलने पाकिस्तानात काढला आहे. फारुखने दाऊदच्या विरोधात कट रचल्याचा छोटा शकीलला संशय होता. या संशयातूनच त्याने त्याचा कराचीत काटा काढला असल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे अंडरवर्ल्डमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्‍वासू असलेला देवडीवाला भारतीय तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण देण्याचे काम करत होता.
भारताविरोधात घातपाती कारवायांसाठी दुबईतून तरुणांची भरती करत असलेल्या देवडीवालाला या वर्षी मे महिन्यात दुबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते.भारतीय यंत्रणा, गुजरात पोलिस त्याचा ताबा घेण्यासाठी पोहोचण्या आधीच पाकिस्तानी यंत्रणांनी तो आपला नागरिक असल्याचे पुरावे सादर करून त्याला ताब्यात घेतले होते. मूळ जोगेश्वरीचा असलेला फारुख हा शारजाहमध्ये राहत असून इंडियन मुजाहिदीन (आयएम) या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य अमीर रजा याच्याशी त्याचे चांगले संबंध असून तो या संघटनेसाठी  काम करतो. तो या संघटनेत सक्रिय असल्याने दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच (एटीएसच्या) तो रडारवर होता. देशात दहशतवादी कृत्ये घडवण्यासाठी भरतीची जबाबदारी घेतल्याच्या कारणावरून काहि वर्षांपूर्वी फारुखला दुबईत अटक करण्यात आली होती.
गुजरातचे गृह मंत्री हरेन पांड्या यांच्या हत्येमागे आणि आयएमसाठी भरती करणे व इतर गुन्ह्यांमध्ये देखील त्याचा समावेश असल्याने भारताला तो हवा होता. परंतु, त्याला भारतात आणण्यात अपयश आलं होतं. पाकिस्तानने 2018 जुलैला बनावट पासपोर्ट व इतर कागदपत्र बाळगल्याप्रकरणी देवडीवालाला अटक केली होती. त्याने दुबईत असतांना भारतीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन दाऊदच्या विरोधात कट रचला होता, अशी माहिती छोटा शकीलला मिळाली. तेव्हापासून शकील फारुख देवडीवाला याच्या मागावर होता.विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर देवडीवालावर विश्वास ठेवणे दाऊदला जरा कठिण वाटले. यातूनच कराचीत त्याची हत्या करण्यात आली.या प्रकरणावर मुंबई गुन्हे शाखेने मौन बाळगले आहे.
कोण होता फारुख देवडीवाला? 
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा विश्‍वासू असलेल्या फारुख देवडीवाला (48) यानेच मुंबईतून अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी फैजल मिर्झाला ( 32) भारतात घातपाती कारवायांसाठी तयार केले होते. याशिवाय स्फोटकांप्रकरणीही अहमदाबाद पोलिसांनी त्याच्याविरोधात पोटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याप्रकरणी 2010 मध्ये देवडीवाला विरोधात इंटरपोलने रेडकॉर्नर नोटीस जारी केली होती. गुजरातमधील हिरेन पंड्या यांच्या हत्येवेळीही फारुखचे नाव पुढे आले होते.