सांगलीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगलीतील कृष्णा नदीच्या पात्रामध्ये बुडालेल्या युवकाचा रविवारी मृतदेह सापडला. सुवेन्दु बेडा (वय 21) असे मृत युवकाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री विश्वकर्मा मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी सरकारी घाटावर तो गेला असता पाय घसरून बुडाला होता. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

कलकत्ता येथील हुबळी जिल्ह्यातील सुवेन्दु सांगलीतील एक सराफी दुकानात कारागीर म्हणून कामास होता. त्याच्यासोबत त्याच्या जिल्ह्यातले इतर मित्रही होते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास तो त्याच्या मित्रांसह सरकारी घाट येथे विश्वकर्मा मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेला होता. नुकत्याच येऊन गेलेल्या महापुराने घाट परिसर चिखलमय झाला आहे. तसेच पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. मूर्ती विसर्जन करण्यासाठी तो नदी पात्रात उतरला असता त्याचा पाय घसरला, पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने तो वाहून गेला.

त्याच्या मित्रांनी घटनेची माहिती सांगली शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने धाव घेत रॉयल कृष्णा बोट क्लब आणि स्पेशल रेस्क्यू फोर्स टीमच्या मदतीने शोध मोहीम राबवली मात्र त्याचा मृतदेह आढळून आला नाही. आज पुन्हा शोधमोहीम सुरू असताना त्याचा मृतदेह सिद्धार्थ परिसराच्या पिछाडीस असणाऱ्या सांगलीवाडी बंधाऱ्या शेजारी आढळला. रॉयल कृष्णा बोट क्लब आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या टीमने तो मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये राजु कांबळे, राजु मोरे, मयुर बिराजदार, सुनिल सोनकांबळे, प्रसाद जामदार, प्रतीक जामदार, गणेश आवटी, गजानन नरळे, अभिजित थोरात हे सहभागी होते.

Visit :- policenama.com