घरकाम करणार्‍या 9 वर्षाच्या मुलीचा गळा दाबून खून झाल्याचं उघडकीस

मीरा रोड/कसारा : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव जिल्ह्यातून घर कामासाठी आणलेल्या 9 वर्षाच्या मुलीच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मृत मुलीला मिरा भाईंदरच्या उत्तन येथे घरकासाठी आणले होते. आरोपीने मुलीचा खून करून तिचा मृतदेह सिमेंटने भरलेल्या ड्रममध्ये पुरुन तो कसारानजीकच्या दरीत फेकला होता. मृत मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बुधवारी बाहेर काढला.

भारती चव्हाण (वय-9 रा. ता. कन्नड जि. औरंगाबाद) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. तर उत्तन येथे राहणारा प्रकाश हरी राठोड हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. आरोपी हा मयत भारतीची आई हिना चव्हाणच्या वडिलांचा मावस भाऊ आहे. सहा महिन्यापूर्वी आरोपी राठोड हा हिनाच्या घरी गेला होता. त्यावळी त्याने भारतीला उत्तन येथील आपल्या घरी घेऊन जाण्याचा प्रस्ताव हिना चव्हाण यांच्यासमोर ठेवला. काही दिवस घरी राहील आणि तिची इच्छा असल्यास शिक्षणही घेईल असा विश्वास आरोपीने मृत मुलीच्या आईला दिला. त्याच्यावर विश्वास ठेवून हिना चव्हाण यांनी भारतीला प्रकाश रोठोड सोबत पाठवले.

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश आणि त्याची पत्नी अनिता या दोघांनी भारतीला घरकामासाठी जुंपले होते. ते दोघे तिचा छळ करत होते. मध्यंतरी त्या दोघांनी भारतीला घरात कोंडून बाहेरगावी गेले होते. यातून त्यांच्यात वाद वाढत गेले. याच रागातून दहा दिवसांपूर्वी प्रकाशने भारतीचा गळा दाबून खून केला. तिचा मृत्यू झाल्याने पत्नीचा भाचा आजू राठोड याच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. भारतीचा मृतदेह पाण्याच्या ड्रममध्ये टाकून ड्रम सिमेंटने भरला. काही दिवस हा ड्रम घरातच ठेवला. त्यानंतर 5 डिसेंबरच्या सुमारास ड्रम दरीत फेकून दिला.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/