Coronavirus : ED च्या 5 अधिकार्‍यांना ‘कोरोना’ची लागण, दिल्लीतील ‘हेडक्वार्टर’ केलं ‘सील’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून ते विविध ठिकाणी काम करणार्‍यांना कोरोनाची लागण होत आहे. सक्तवसुली संचालनालयातील (ईडी) पाच अधिकार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मुख्यालय सील करण्यात आले आहे.

सक्तवसुली संचालनालयातील (ईडी) पाच अधिकार्‍यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दिल्लीच्या खान मार्केट परिसरात असलेल्या ‘लोक नायक भवन’ या ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकार्‍यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर मुख्यालय सील करण्यात आले आहे. तर, कोरोनाची लागण झालेल्या अधिकार्‍यांना आणि त्यांच्या काही कुटुंबियांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

दरम्यान, निर्बंध शिथिल केल्यानंतर देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सलग दुसर्‍या दिवशी नऊ हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. व्हायरसमुळे शुक्रवारी देशात 295 रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी इतके मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारत इटलीला मागे सोडून कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. इटलीमध्ये 2 लाख 34 हजार 531 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली होती. भारतात हीच संख्या 2 लाख 36 हजार 117 झाली आहे.