दिल्ली बॉम्बस्फोटामागे इराणमधील दहशतवाद्यांचा हात असल्याचं संशय, घटनास्थळावर सापडलेल्या चिठ्ठीत लिहीलं – ‘हा तर फक्त ट्रेलर आहे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ शुक्रवारी (दि. 29) झालेल्या बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली आहे. या चिठ्ठीत ‘हा तर फक्त ट्रेलर आहे, असा इशारा देणारा मजकूर लिहिलेला असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या चिठ्ठीत इराण लष्कराचे कमांडर कासीम सुलेमानी आणि अण्वस्त्र शास्त्रज्ञ मोहसीन फखरजादेह यांच्या नावांचा शहीद असा उल्लेख केला आहे. या दोघांचीही गेल्या वर्षी हत्या करण्यात आली होती. त्यामुळे चिठ्ठीतून या हल्ल्यामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचा संकेत मिळत आहे.

इस्रायली दूतावासाजवळ बॉम्बस्फोट झाल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाली असून तपास सुरु केला आहे. परिसरातील तीन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक कॅब दोघांना घटनास्थळी सोडून गेल्याचे दिसून येत आहे. कॅबमधून उतरल्यानंतर दोन्ही व्यक्ती ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला, तिथे पायी जात असल्याचे दिसत आहे. सीसीटीव्हीत ही माहिती मिळाल्यानंतर स्पेशल सेलने कॅब चालकाशी संपर्क केला असून, दोन्ही व्यक्तींची स्केच तयार केली जात आहेत.

घटनास्थळी पोलिसांना बरेच साहित्य मिळाले असून यात एक लिफाफा सापडला आहे. लिफाफ्यात एक चिठ्ठी होती. या चिठ्ठीत ‘हा तर फक्त ट्रेलर आहे, असा इशारा देणारा मजकूर लिहला आहे. बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी आढळलेल्या वस्तू वस्तू जप्त केल्या आहेत. शीतपेयाच्या बॉटलचे तुकडे आणि बेअरिंगमधील छर्रे सापडले आहेत. सापडलेल्या वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेल्या आहेत.

दरम्यान, या घटनेच्या तपासासाठी इस्रायलमधील एक पथकही भारतात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.