राजधानी दिल्लीत ‘कोरोना’चा हाहाकार, स्मशानभुमीत पार्थिवांसाठी नाही जागा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत कोरोना संसर्गाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. त्यासोबतच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. वर्षानुवर्षे निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करणारे आचार्य देखील म्हणत आहेत की, कोरोना काळात त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

गेल्या १५ दिवसांपासून दररोज ४० ते ५० मृतदेहांवर निगमबोधचे आचार्य आणि त्यांची टीम अंत्यसंस्कार करत आहे. परिस्थिती अशी आहे की, तेही आता कंटाळले आहेत. सतत वाढते मृतदेह पाहून ते देखील अस्वस्थ झाले आहेत.

ते म्हणाले की, जेव्हा कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांचे मृतदेह जास्त येऊ लागले, तेव्हा सरकारने आणखी ४ स्मशानभूमी तयार करण्यास सुरवात केली आहे.

निगमबोध घाटातील परिस्थिती अशी आहे की, दिवसेंदिवस ४८ प्लॅटफॉर्म कमी पडत आहेत. त्यामुळेच नदीकाठी आणखीन २५ जागा नवीन मृतदेहांसाठी तयार केल्या जात आहेत.

स्मशानभूमीत जागेची कमतरता
दिल्लीत एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या ३४,००० च्या वर गेली आहे, तर दुसरीकडे मृत्यूसंख्याही दररोज वाढत आहे. पण स्मशानभूमीत आता जागा कमी पडत आहे.

त्यामुळेच दिल्लीत अगोदर दोन स्मशानभूमी होत्या, त्या वाढवून आता ४ करण्यात आल्या आहेत. स्मशानभूमीत रोज जेवढे कोरोना रूग्णांचे मृतदेह आणले जातात, त्यांचे अंत्य संस्कार केले जातात. त्यातही ५ ते ६ तास लागतात.

निगमबोध घाटावर जागा कमी पडत आहे
निगमबोध घाटात लोकांच्या अंत्यसंस्कारांसाठी जवळपास १०० प्लॅटफॉर्म आहेत, त्यापैकी ४८ प्लॅटफॉर्मवर सध्या कोरोना मृतदेहांचे अंत्य संस्कार केले जातात. आता सर्व प्लॅटफॉर्म पूर्णपणे भरले आहेत. एकामागून एक मृतदेह रुग्णवाहिकांमधून आणले जात आहेत आणि त्यांचे अंत्य संस्कार केले जात आहेत.

रुग्णालयांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप
मोनिकाने आपल्या वडिलांना दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात भरती केले होते. रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप मोनिकाने केला आहे. सकाळी ती वडिलांचा मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचली तेव्हा रुग्णालयातून दुसर्‍या व्यक्तीचा मृतदेह तिला देण्यात आला. मोनिकाची अडचण येथेच संपली नाही, तर ती जेव्हा निगमबोध घाट येथे तिच्या वडिलांचे अंत्य संस्कार करण्यासाठी गेली तेव्हा तिथेही तिला चार ते पाच तास थांबावे लागले.