दिल्ली विधानसभा : ‘शाहीन बाग’बद्दल वक्तव्य केल्यानं भाजपाचे उमेदवार कपिल मिश्रा ‘अडचणीत’, EC कडून प्रचार करण्यास 48 तासांचा ‘बॅन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या शाहीन बागला मिनी पाकिस्तान म्हटल्याच्या विधानावरून मॉडेल टाऊन असेंब्लीमधून भाजपचे उमेदवार असलेले कपिल मिश्रा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यामुळे निवडणूक आयोगाने भाजप उमेदवार कपिल मिश्रा यांना 48 तास प्रचारासाठी बंदी घातली आहे. दिल्लीतील मॉडेल टाऊनमधील भाजपचे उमेदवार कपिल मिश्रा यांनी शाहीन बागला मिनी पाकिस्तान म्हणून संबोधले होते. त्याशिवाय कपिल मिश्रा यांनीही ट्विट केले होते की 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये ‘हिंदुस्तान आणि पाकिस्तान’ दिल्लीच्या रस्त्यावर आमने- सामने उतरतील.

या प्रकरणात निवडणूक आयोगाने कपिल मिश्रा यांना नोटीस पाठवली. कपिल मिश्रा यांनीही या नोटीसला उत्तर दिले होते. यानंतर कपिल मिश्रा यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कपिल मिश्राविरोधात एफआयआरही दाखल केला आहे. दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी रणबीर सिंह यांनी कपिल मिश्रांविरोधात एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिल्ली पोलिसांना दिले.

याशिवाय मिनी पाकिस्तानबाबतच्या विधानावरून निवडणूक आयोगाने कपिल मिश्रा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गुरुवारी निवडणूक अधिकारी बनवारीलाल यांनी कपिल मिश्रा यांना बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, शाहिन बागेवरील तुमच्या विधानाविषयी बऱ्याच बातम्या आल्या आहेत. जसे की दिल्लीत छोट्या- छोट्या शाहिन बाग बनल्या आहेत, शाहिन बागेत पाकची एन्ट्री आणि आठ फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान दिल्लीच्या रस्त्यावर, अशी विधाने केल्याचे कळते.

निवडणूक अधिकारी म्हणाले होते की, आचारसंहिता आणि लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला अशा प्रकारच्या हालचालींमध्ये सहभागी न होणे बंधनकारक आहे, ज्यामुळे आपापसात द्वेष वाढवू शकेल किंवा विविध जाती, समुदाय, धर्म किंवा भाषा यांच्यात तणाव किंवा द्वेष निर्माण होईल. मग या विधानामुळे आपल्यावर कारवाई का करू नये?

फेसबुक पेज लाईक करा –