घाई गडबड केली अन् जीवाला मुकली : युवतीचा मृत्यू

नवी दिल्‍ली : वृत्‍तसंस्था – ‘अति घाई संकटात नेई’ अशी मराठीमध्ये म्हण आहे. घाई गडबडीत एखादे कृत्य केल्यास ते किती महागात पडू शकते याचा प्रत्यय नवी दिल्‍लीतील ब्रम्हपुरीत राहणार्‍या एका कुटुंबाला आला आहे. ब्रम्हपुरी परिसरात राहणार्‍या एका युवतीने घाईत पाणी समजून चक्‍क अ‍ॅसिड गटागटा प्यायले. त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे.
पुष्पा (वय 18) असे मृत्युमूखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. पुष्पा ही तिच्या कुटुंबीयांसह ब्रम्हपुरीमध्ये रहावयास होती. पुष्पाच्या रूमला सलग्‍न असलेले बाथरूम स्वच्छ करण्यासाठी अ‍ॅसिडची एका बाटली रूममध्ये ठेवण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ती बाहेरून घरी पोहचली. आपल्या रूममध्ये गेल्यानंतर तिने घाईत पाणी समजून अ‍ॅसिडची बाटली तोंडाला लावली. पुढच्या काही क्षणातच तिला प्रचंड त्रास होवु लागला. आपल्याकडुन चुकून पाण्याऐवजी अ‍ॅसिड प्राशन झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिच्या कुटुंबीयांनी तिला तात्काळ नजीकच्या जीटीबी हॉस्पीटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

शनिवारी शवविच्छेदनानंतर तिची बॉडी तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आली. पुष्पाने घाई गडबडीत अ‍ॅसिड प्राशन केले की अन्य काही कारण त्यामागे आहे याबाबतचा तपास पोलिस करीत आहेत. मात्र, पुष्पाने घाईमध्येच अ‍ॅसिड प्राशन केल्याची माहिती कुटुंबीय पोलिसांना देत आहेत. पुष्पा ही एका खासगी कंपनीत कामाला होती तर तिचे वडिल पुरनलाल हे छाटी-मोठी मिळेल ती कामे करतात. याप्रकरणी न्यु उस्मानपुर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.