धक्कादायक ! राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ तरुणीवर बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  राजधानी दिल्लीमध्ये कोरोना संकटाच्या काळामध्ये एक धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका 23 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी दोन दिवसांनी अटक केली आहे. आरोपी आणि पीडित तरुणी हे एकमेकांच्या ओळखीचे होते. ही सामूहिक बलात्काराची घटना नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहान (वय-23) असे आरोपीचे नाव असून पीडित तरुणी मुळची पश्चिम बंगालची रहिवासी आहे. शनिवारी दुपारी आरोपीने तिला लाल किल्ल्याजवळ नेले आणि तेथील झुडुपात तिच्यावर बलात्कार केला. लग्न करण्याबाबत त्यानं तिला विचारणा केली होती. परंतु तिनं त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणात एकच आरोपी असून त्याला अटक करण्यात आली आहे. ही सामूहिक बलात्काराची घटना नाही. आरोपी आणि पीडिता हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दोघेही बेघर असल्याची माहिती उत्तर दिल्लीचे पोलीस उपायुक्त मोनिका भारद्वाज यांनी दिली. आरोपी आणि पीडिता यांचे भांडण झाले होते. याच रागातून आरोपीने तिला विट मारली यामध्ये ती जखमी झाली. त्यानंतर घटनास्थळावरून आरोपी फरार झाला. सोमवारी दुपारी त्याला अटक करण्यात आली आहे. तर पीडित तरुणीची रवानगी नारी निकेतमध्ये करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.