मेट्रो स्टेशनवर बॅगेत 500 च्या बनावट नोटा आढळल्यानं प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली येथील काश्मीरी गेट मेट्रो स्टेशनवर एका बेवारस बॅगेतून 500 रुपयांच्या लाखोंच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बॅगेतून 4 लाख 64 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नकली नोटा जप्त केल्या आहेत. सीआयएसएफने या नोटा शनिवारी सायंकाळी जप्त केल्या.

सीआयएसएफचे महेंद्र सिंह यांनी याबाबत आज (रविवार) माहिती दिली. याप्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. जप्त केलेल्या नोटा या मेट्रो स्टेशनवर सापडल्या असून जप्त केलेल्या नकली नोटांची बॅग मेट्रो रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. बॅगेत सापडलेल्या सर्व 500 च्या नोटा असून त्या बनावट नोटा असल्याचे सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

महेंद्र सिंह यांनी सांगितले की, बनावट नोटा असलेली बॅग सीआयएसएफचे पोलीस उपनिरीक्षक बिरेंद्र सिंह यांना आढळून आली. ही बॅग काश्मीरी गेट मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 8 जवळ बेवारस आढळून आली. त्यांनी या बॅगेच्या मालकाची चौकशी केली. मात्र, या बॅगेबाबत कोणालाच काही माहित नसल्याने त्यांनी याची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली. पोलीस आणि सीआयएसएफचे अधिकारी बॅग सापडली त्या ठिकाणी गेले. त्यांनी बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये 500 रुपयांच्या नोटा आढळून आल्या. तपासादरम्यान या बनावट नोटा असल्याचे समोर आले. पोलीस आणि सीआयएसएफचे अधिकारी मेट्रो स्थानकावर लावण्यात आलेले सीसीटीव्हीचे फुटेज तपासत आहेत.

visit : Policenama.com