दिल्लीच्या तीस हजारीनंतर आता ‘कडकडडूमा’ कोर्टात पोलिस आणि वकिलांमध्ये ‘हाणामारी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज वकिलांनी संप पुकारला आहे. शनिवारी कडकडडूमा कोर्टात पोलिस आणि वकीलांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शुल्लक कारणावरून पोलीस आणि वकिलांमध्ये वाद वाढला आणि त्यानंतर वकिलांनी पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात पोलिस कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे दिल्ली कोर्टातील पोलिस कर्मचारी आणि वकील यांच्यात तणाव वाढला आहे. शनिवारी घडलेल्या या वादानंतर आज पहिल्यांदा तीस हजारी कोर्ट सुरू होत आहे.

या घटनेच्या निषेधार्थ दिल्ली बार असोसिएशनने सोमवारी दिल्लीतील सर्व जिल्हा न्यायालयांमध्ये एक दिवसांचा संप पुकारला आहे. वकिलांनी संपाची घोषणा केल्यानंतरही दिल्ली पोलिस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कोर्टाच्या आवारात सुरक्षेची व्यवस्था करणे इतके सोपे नाही. कारण तीस हजारीमध्ये अजूनही पोलिस आणि वकील यांच्यात चकमकी होण्याची शक्यता आहे.

कोर्टाच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची विशेष रणनीती –

कोर्टाच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी सोमवारी विशेष रणनीती आखली आहे. या रणनीतीचा एक भाग म्हणून, वकिलांनी मारहाण केलेल्या पोलिसांना पुन्हा कोर्टाच्या आवारात सोमवारी उभे करू नये असा निर्णय घेण्यात आला आहे. कोर्ट कॅम्पसमध्ये नवी पोलिसफौज तैनात करण्यात येणार आहे. ज्यामध्ये पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या पोलिसांचा समावेश असेल. सामान्य लोकांमध्ये कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी पोलीस ठाण्यात काम करणारे पोलीस नेहमीच अनुभवी मानले जातात.

विशेष पोलिस आयुक्तांना हटवले –

दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात शनिवारी वकील आणि पोलिसांमधील हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी विशेष पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) संजय सिंग (1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी) यांना हटवले आहे. दक्षिण दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त आर.एस. कृष्णा यांना उत्तर दिल्लीचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

Visit : Policenama.com