नोकरीसाठी 2 गटात तुफान राडा, एकमेकांवर केले 39 सपासप वार

दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार वाट्टेल तो खटाटोप करतात. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. बेरोजगारीमुळे तरुण नोकरीच्या शोधात असून नोकरी (Job) मिळवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. नोकरीची संख्या कमी झाल्याने हा संघर्ष अधिक वाढला आहे. नोकरी मिळवण्याच्या तणावामुळे तरुणांच्या दोन गटांमध्ये (Two Groups) तुफान राडा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन गटांनी एकमेकांवर चाकूने (Knife) हल्ला करत तब्बल 39 सपासप वार केले. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना राजधानी दिल्लीमधील (Delhi) सफदरजंग भागात घडली. या प्रकरणात पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली असून यामध्ये एक अल्पवयीन आहे. सफदरजंग हॉस्पिटलमध्ये (Safdarjung Hospital) कंत्राटी पद्धतीवर नोकरी करण्याच्या मुद्यावर तरुणांच्या दोन गटांमध्ये वादावादी झाली आणि या वादावादीचं रुपांतर मारामरात आणि चाकू हल्ल्यात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नीरज आणि मुकेश हे दोन तरुण बऱ्याच दिवसांपासून सफदरजंग हॉस्पिटलमध्ये एका कंपनीच्या मार्फत कंत्राटी कामगार होते. कृष्णा, रवी आणि त्यांच्या मित्रांनाही हॉस्पिटलमध्ये काम करण्याची इच्छा होती. मात्र, त्यांच्या नोकरीचं काम होत नव्हतं. हे सर्व तरुण दोन दिवसांपूर्वी रात्री एकत्र पार्टी करत होते. त्यावेळी नोकरीच्या मुद्यावरून त्यांच्यात वाद सुरु झाले.

हे एवढे वाढले कि कृष्णाने त्याच्याजवळ असलेल्या चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यात तीनजण गंभीर जखमी झाले. त्यानंतर कृष्णा घटनास्थळावरुन फरार झाला. जखमींना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना नीरजचा मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्याबरोबर रवी आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. या सर्वांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.