दिल्ली हिंसाचार प्रकरणाचं आरोपपत्र दाखल, नगरसेवक ताहिर हुसेन ‘मास्टरमाईंड’ असल्याचा पोलिसांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली हिंसाचार प्रकरणात गुन्हे शाखेने करकरडूमा कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले आहे. दिल्ली पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात आम आदमी पक्षाचे माजी नेते आणि नगरसेवक ताहिर हुसेन हाच मास्टरमाईंड असल्याचे म्हटले आहे. आरोपपत्रात नगरसेवक ताहिर हुसेन याच्यासह 15 जणांना आरोपी करण्यात आले आहे.

गुन्हे शाखेने सुमारे एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात ताहिर हुसेनचा भाऊ शाह आलम याच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. हिंसाचाराच्या वेळी आरोपी ताहिर हुसेन याच्या घराच्या छतावर होता असे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. ताहिर हुसेनवर हिंसाचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताहीरने हिंसाचारासाठी 1 कोटी 30 लाख रुपये खर्च केले होते.

दिल्ली पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, हिंसाचारापूर्वी आरोपी ताहिर हुसेन याने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) च्या निषेधात सहभागी असलेल्या लोकांशी चर्चा केली होती. तसेच ताहीर याने जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याच्याशी देखील चर्चा केली होती.

आरोपपत्रानुसार दिल्ली हिंसाचाराची संपूर्ण तयारी अगोदरच करण्यात आली होती. ताहिर हुसेननं लोकांना सांगितले होते कि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम दिल्लीत येतील त्यावेळी दिल्लीत हिंसाचार केला जाईल. मात्र पोलिसांनी या आरोपपत्रात ओमल खालिदला आरोपी बनवले नाही.

कोण आहे ताहिर हुसेन
हाजी ताहिर हुसेन हा मुस्तफाबाद विधानसभेच्या नेहरू विहार प्रभागातील नगरसेवक आहे. दिल्ली हिंसाचारात ताहीर हुसेनचे नाव समोर आल्यानंतर आम आदमी पक्षाने त्याला पक्षातून काढून टाकले. त्याच्यावर दिल्लीत हिंसाचार पसरवल्याचा आरोप आहे, ज्यात इंटेलिजेंस ब्युरोचा (आयबी) कर्मचारी अंकीत शर्मा यांचा खून केल्याचा आरोप आहे. त्याच्या घराच्या छतावरून शर्मा यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे.