Hinjewadi News : डिलिव्हरी बॉयला पुलावरून फेकून देण्याची धमकी देत लुटले

हिंजवडी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रिक्षाने जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ग्राहकाने परत केलेले पार्सल घेऊन रिक्षातून परतत असताना, रिक्षाचालक आणि प्रवाशांनी धमकावून त्याला लुटले. ही घटना भूमकर चौकातील सर्व्हिस रोडवर सोमवारी (दि.4) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

मनिषकुमार भोगी पासवान (वय-22 रा गुरुदत्त अपार्टमेंट, शिवाजी पुतळा जवळ मांजरी बुद्रुक, मुळ रा. कल्याणपूर, बिहार) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. परमेश्वर गंगाधर लोंढे (वय-23 रा. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पासवान हे डिलिव्हरी बॉयचे काम करतात. हिंजवडी येथील एक ऑर्डर रिटर्न झाली होती. ती ऑर्डर परत घेऊन जात असताना हिंजवडीमधील शिवाजी चौकातून बाणेर येथे शेअर रिक्षातून ते जात होते. त्यावेळी प्रवासादरम्यान, त्यांच्यासोबत शेअरिंगमधील दोन सहप्रवासी बसले. रिक्षा चालकाने पासवान यांना त्यांच्या इच्छितस्थळी न सोडता अज्ञात ठिकाणी घेऊन गेला.

दरम्यान, प्रवासात सहप्रवाशांनी फिर्यादी यांच्याकडील हेडफोन, पावरबँक, दीड हजार रुपये, चांदीची चेन, मोबाईल असा एकूण 44 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला. तसेच फिर्यादीस मारहाण करुन आरडाओरडा केल्यास ब्रिजवरुन टाकून देण्याची धमकी दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या मनीषकुमारने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीच्या अवघ्या पाच तासांत माग काढला. पोलिसांनी परमेश्वर लोंढे या आरोपीला अटक केली पुढील तपास पोलीस करत आहेत.