शिवसेना, NCP, काँग्रेसची सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देण्याची मागणी, राजभवनात दिलं 162 आमदारांचे पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच इकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्याला सरकार स्थापन करण्यास निमंत्रित करावे अशी विनंती केली आहे. तिन्ही पक्षांनी मिळून हे पत्र राजभवनमध्ये दिले आहे. या पत्रावर शिवसेनेचे विधीमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या सह्या आहेत. या पत्राबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या १६२ आमदारांच्या सह्यांची यादी जोडलेली आहे.

या पत्रात शनिवार दि. २३ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. परंतु, त्यांनी यापूर्वी विधानसभा सदस्यांचे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे सरकार स्थापण्यास असमर्थता दर्शविली होती. आताही त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. आज देखील त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने ते बहुमत सिद्ध करु शकणार नाहीत आणि म्हणून ते बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्यानंतर आम्ही शिवसेना पक्ष सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहोत.

सोबत शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तसेच सहयोगी व अपक्ष विधानसभा सदस्य यांची सह्यानिशी यादी सोबत जोडत आहोत. सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे संख्या बळ असल्याने आम्हास सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

जर फडणवीस सरकार बहुमत सिद्ध करु शकले नाही तर फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागेल. मात्र, राजीनामा देताना फडणवीस राज्यपालांना विधानसभा बरखास्त करण्याची सूचना ते करु शकतात. त्याचा फायदा घेऊन राज्यपाल विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस करु शकतात. राज्यपालांना ही संधी मिळू नये, म्हणून आजच तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे आताच आपल्याला बहुमत असल्याचे सांगून सत्ता स्थापन करण्याची मागणी केली आहे.

Visit : Policenama.com