नगर शहरातील ‘ते’ डेंटल क्लिनिक सील !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – तोतयागिरीच्या संशयावरून शहरातील एक डेंटल क्लिनिक जिल्हा शल्य चिकित्सक व पोलिसांच्या संयुक्त पथकाने सोमवारी रात्री उशिरा सील केले. याप्रकरणी आज काही डॉक्टरांची चौकशी केली जाणार आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शहरातील सावेडी उपनगरातील एका इमारतीत डेंटल क्लिनिक सुरू आहे. या क्लिनिकमध्ये ज्या डॉक्टरांची नावे नमूद आहे, ते डॉक्टर न थांबता पदवी नसलेला डॉक्टर वैद्यकीय उपचार करतो, अशी माहिती समजली होती. त्यावरून जिल्हा शल्यचिकित्सक, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तोफखाना पेलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे आदींच्या पोलिस पथकाने सोमवारी रात्री सदर रुग्णालयावर छापा टाकला. पोलीस येण्यापूर्वीच रुग्णालय चालविणारा डॉक्टर पसार झाला होता.

रुग्णालयात ज्या डॉक्टरांची नावे व पदवी लिहिलेली आहेत, अशा डॉक्टरांना बोलावून घेण्यात आले. रुग्णालयात लावलेल्या डॉक्टरांचे पदवी प्रमाणपत्र ताब्यात घेण्यात आले. पोलिस व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंचनामा करून क्लीनिक सील केले. मध्यरात्रीपर्यंत पोलिसांची ही कारवाई सुरू होती.

रुग्णालयात ज्या डॉक्टरांच्या पदव्या आहेत, अशा डॉक्टरांना चौकशीसाठी तोफखाना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. सदर डॉक्टरांकडे आज चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.