दुर्देवी ! बीडमध्ये शेतकर्‍यानं 2 एकरच्या कोबीवर फिरवला नांगर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 35 दिवसांपासून देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागातील अर्थकारण कोलमडले आहे. विशेषतः भाजीपाला उत्पादकांवर मोठा परिणाम झाला आहे. बाजारपेठ नाही, योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील चोरंबा येथील शेतकर्‍याने हताश होवून दोन एकरवरील कोबीच्या पिकावर नांगर फिरविल्याने दोन लाख रूपयांच्या उत्पन्नावर पाणी फिरले आहे.

बीड जिल्ह्यात चोरंबा ( ता.धारूर ) येथील सचिन राजाभाऊ चव्हाण या शेतकर्‍याने दोन महिन्यापूर्वी दोन एकर क्षेत्रावर कोबीची लागवड केली,खर्च करुण कोबी विक्रीला आली आणि टाळेबंदी झाली. त्यामुळे कोबीवर नांगर फिरवला. दीड ते दोन लाख रुपये उत्पन्नावर पाणी फेरले आहे. शेती आणि शेतीशी निगडित घटकांना बाजारपेठ बंद असल्याचा सर्वाधिक फटका बसू लागल्यानेच शेतकरी आता टोकाचे पाऊल उचलू लागले आहेत. फळ आणि पालेभाज्याचे उत्पादन घेणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. कांदा, बटाटा , लसूण, या फळभाज्यांबरोबरच टरबूज, खरबूज, आंबे , मोसंबी , डाळिंब आदी फळे विक्रीसाठी पुणे, मुंबईसह इतर ठिकाणच्या बाजारपेठेत नेली जात आहेत. तर पालेभाज्या जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणच्या बाजारपेठेत जातात. मात्र टाळेबंदीमुळे सर्वच बंद असल्याने भाजीपाला उत्पादक अडचणीत सापडले आहेत. संचारबंदीमुळे बाहेरगावी जावून त्याची विक्री करणे शक्य नाही.

एक दिवसाआड शिथिलता दिली जात असली तरी ती केवळ अडीच तासांसाठीच आहे. या वेळेत शहरात जायचे आणि विक्री करायची कशी? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. शेतकर्‍यांना विक्रीसाठी परवाने मिळत असले तरी त्यासाठी वाहन हवे ,गट हवेत. लग्नसोहळे , सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्याने पाले भाज्या आणि फळ भाज्यांची मागणी घटली. परिणामी भाव देखील कमी मिळत असल्याने हताश होवून शेतकरी भाजीपाल्यावर नांगर फिरवू लागला आहे.