Lockdown : बनावट कागदपत्रांद्वारे E-Pass बनवून देणारे रॅकेट उद्धवस्त

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनच्या काळात सायबर चोरटे लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करीत असताना आता बनावट कागदपत्रांद्वारे ई पास बनवून देणार्‍या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कल्याण परिमंडळ ३ च्या ई पास पडताळणी पथकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यातून हे बनावट पास देणारे रॅकेट समोर आले आहे. खडकपाडा परिसरातील एका सायबर कॅफेमधून हा सर्व प्रकार सुरु होता.

ई पास तपासणी करीत असताना हा बनावट प्रकार उघडकीस आला. त्याचा पुढे शोध घेतल्यानंतर हे रॅकेट उघडकीस आले. ई पास पडताळणी पथकातील पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य धोंडे यांनी याबाबत खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातून दुसर्‍या ठिकाणी प्रवास करायचा असेल तर संबंधित व्यक्तीकडे ई पास असणे बंधनकारक आहे. त्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाईवर एक विशेष फॉर्म बनविण्यात आला आहे.

त्यात सर्व माहिती भरल्यावर ई पास जारी केला जातो. परराज्यातील अनेक मजूर आपापल्या गावी जाण्यासाठी इच्छुक आहेत. अशा लोकांकडून पैसे उकळून बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांना ई पास बनवून दिले जात होते. खडकपाडा परिसरात असणार्‍या सायबर कॅफेमधून हा सर्व प्रकार सुरु होता.
हे सायबर चोरटे अगदी कल्याण बाहेर राहणार्‍यांनाही कल्याणमध्ये राहत असल्याची बनावट कागदपत्रे बनवून त्यांना पास देत असत. या रॅकेटमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत व त्यांनी आतापर्यंत किती जणांना असे बनावट ई पास बनवून दिले याचा तपास करण्यात येत आहे.