कोकणसाठी शरद पवारांचे खूप मोठे स्वप्न, अजित पवारांनी दिला दिला ‘हा’ विश्वास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  महाराष्ट्राला अनेक क्षेत्रात पुढे नेण्याचे प्रयत्न होत असताना कोकणला ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची मोठी संधी आहे. कोकणात नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर ‘इनोव्हेटीव्ह’ संशोधनासाठी अनुकुल वातावरण व क्षमता आहे. त्यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करावी, अशी सूचना ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी मंगळवारी (दि. 6) केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासन कोकणच्या शाश्वत विकासासाठी बांधिल असून शरद पवार यांच्या सूचनेची अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वास या बैठकीत दिला.

कोकण विभागास (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे) आंतरराष्ट्रीय नवोन्मेश (इनोव्हेशन) विभाग म्हणून विकसित करण्यासंदर्भात मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आज विशेष बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, परिवहनमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यावरणमंत्री अदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री अदिती तटकरे आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पुण्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ संदर्भात सादरीकरण केले.

शरद पवार म्हणाले की, इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ कोकणात अनुकुल वातावरणासह येथे बुद्धीमत्ता, सर्जनशीलता प्रचंड आहे. मुंबई विद्यापीठ, कृषी विद्यापीठ, मत्स्यविज्ञान संस्था याठिकाणी आहेत. कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून घेत तेथील निसर्गाला हानी न पोहचवता या विभागाचा विकास करणे शक्य आहे. पुढील पन्नास-शंभर वर्षांचा विचार करून यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे, असेही शरद पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरही या संकल्पनेचे सादरीकरण करून त्यांच्या मान्यतेनंतर पुढे जावे, अशी सूचनाही शरद पवार यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरही या संकल्पनेचे सादरीकरण करून त्यांच्या मान्यतेनंतर पुढे जावे, अशी सूचनाही शरद पवार यांनी केली.

हा प्रकल्प भविष्यात राज्यासाठी मोठी गुंतवणूक ठरेल : उपमुख्यमंत्री पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोकणातील तिन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आजची बैठक होत आहे. तिन्ही मंत्री आणि राज्य सरकार कोकणचा ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकास करण्यासाठी सकारात्मक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादरीकरणानंतर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच हा प्रकल्प राज्यासाठी भविष्यातील मोठी गुंतवणूक ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.