स्वस्त घरांचे स्वप्न दाखवून फसवणूक करणाऱ्या बिल्डरला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- शहरात स्वस्तात घरे उपलब्ध करुन देण्याचे स्वप्न दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला विक्रोळी पोलिसांनी अटक केली आहे. देवदास राव, असे त्याचे नाव असून त्याचा मुलगा तेजस्वी राव, मुलगी नंदिता राव यांच्यासह कर्मचारी भावना मेनन यांनाही अटक करण्यात आली आहे. देवदास राव यांच्या धनिष्ठा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सवर ४५ लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

धनिष्ठा बिल्डर्स आणि डेव्हलपर्सने झोपू योजने अंतर्गत विक्रीसाठी घरे उपलब्ध असल्याची जाहिराती दिली होती. जाहिरातींना भुलून अनेकांनी त्यांच्या कार्यालयात घरांची बुकिंग केली होती. आगाऊ रक्कम भरल्यास भाव कमी करून देऊ, असे विकासकाने ग्राहकांना सांगितले होते. २००९ पासून आतापर्यंत ४ लाखापासून ते ८० लाख रुपयांपर्यंतची आगाऊ रक्कम ग्राहकांनी विकासकाला दिली होती. अनेक वर्ष उलटूनदेखील प्रकल्प उभे राहत नव्हते. त्यामुळे ग्राहकांनी अखेर विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भादवी कलम ४२०, ४०६, ३४ सह महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप अ‍ॅक्ट कलम ४ अंतर्गत पोलिसांनी ही कारवाई केली.

वेश्या व्यवसायातून पश्चिम बंगालच्या ६ मुलींची सुटका

ठाणे : चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललेल्या पश्चिम बंगालच्या ६ मुलींची सुटका करण्यात आली आहे. ही घटना ठाणे येथे घडली असून पोलिसांनी दलाल कुमारी उर्फ बिन्नु जामबहादूर तामंग (३५) या महिलेस अटक केली आहे. तर कुंटणखाना चालवणारी सीमा आंटी व घरमालक पप्पू हजाम हे फरार आहेत. ठाणे येथे दलाल व कुंटणखाना मालकिण तसेच घरमालकाच्या संगनमताने बंगालमधील ६ मुलींना नोकरीचे आमिष दाखवून आणले. त्यानंतर भिवंडीतील एका कुंटणखान्यात त्यांना डांबून बळजबरीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले.