अश्लील शिवीगाळ प्रकरण ! पोलीस महासंचालकांकडून अकोल्याच्या SP ची चौकशी करण्याचे आदेश, नागपूर IG चे पथक दाखल

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराला अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गावकर यांनी मानसिक त्रास दिल्याने सिक रजेवर जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली होती. त्यांनी अमरावती परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांच्याकडे तक्रारही नोंदविली होती. त्याची दखल पोलीस महासंचालकांनी घेतली असून नागपूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांना अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गावकर यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. महासंचालकांच्या आदेशानुसार प्रसन्ना यांनी चौकशीसाठी अकोला येथे एक पथक पाठविले आहे.

याबाबत सुरेश हरिभाऊ नाईकनवरे हे अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गेली २१ वर्षे त्यांची सेवा झाली आहे. मात्र, अमोल गावकर हे आपल्याला जिल्ह्यात हजर झाल्यापासून लहान सहान कारणांवरून अश्लील शिवीगाळ करुन अपमानित करत आहेत. एस पी नी आपल्याला १० एप्रिल रोजी दुपारी कक्षात बोलावून इडियट यू बास्टर्ड  म्हणून शिवीगाळ केली. तुम्ही आयुक्तांना माझ्या परवानगीशिवाय पत्र का दिले, असे म्हणून आपला अपमान केला. त्यामुळे आपला रक्तदाब वाढला असून आपली शारिरीक हानी होण्याची शक्यता आहे. याच कारणावरुन आपल्या मनात आत्महत्येचा विचार येऊ लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या संचारबंदीमुळे सध्या आपणास भेटणे शक्य नसल्याने आपण लेखी पत्र तसेच पोलीस अधीक्षक अमोल गावकर यांनी केलेल्या शिवीगाळीच्या तीन  ऑडिओ क्लिप आपल्या व्हॉटसअ‍ॅपवर पाठविले आहेत, असे नाईकनवरे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.