‘ताई’ मला संपवण्याची भाषा करते, मी असं काय केलंय ?, धनंजय मुंडे झाले भावुक

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारांच्या तोफा आज थंडावल्या. आज शेवटच्या दिवशी बहुतांश नेत्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये प्रचार सभा घेत प्रचाराचा समारोप केला. शेवटच्या दिवशीच्या सभांमध्ये अनेकांनी मतदारांना भावनीक हाक दिली तर काही ठिकाणी नेते स्वत: भावुक झाल्याचे पहायला मिळाले. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये बहिण-भावांमध्ये लढत होते. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे हे सभेदरम्यान भावुक झाल्याचे पहायला मिळाले.

भर सभेत माझी बहीण मला दुष्ट राक्षस म्हणते. मला संपवण्याची भाषा करते. मी अस काय केलंय ? असे भावुक भाषण धनंजय मुंडे यांनी केले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी धनंजय मुंडे यांनी आपल्याच मतदारसंघामध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर सडकून टीका केली. दरम्यान दुसरीकडे पंकजा मुंडे प्रचाराच्या शेवटच्या सभेनंतर स्टेजवर चक्कर येऊन कोसळल्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

धनंजय मुंडे यांनी परळीत घेतलेल्या सभेत प्रतिस्पर्धी आणि भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडेंबद्दल बोलताना म्हणाले, भर सभेत माझी बहीण मला दुष्ट राक्षस म्हणते. मी आपल्या मातीतल्या माणसाला मोठा करण्यासाठी झटतोय. मी राक्षसासारखं काय केलंय ? असे म्हणत धनंजय भावुक झाले. ताई, 10 वर्षापूर्वी तुम्ही मला भरल्या ताटावरुन उठवलंत. मी बाजूला झालो. त्यावेळी तुम्हाला निवडून आणलं म्हणून मी राक्षस का ? असे भावुक होत प्रश्न उपस्थित केले.