‘गँगस्टर’ इक्बाल मिर्ची प्रकरणी तपासात सहकार्य न केल्यानं ED कडून DHFL प्रमुखास अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मृत गॅंगस्टर इक्बाल मिर्ची पीएमएलए प्रकरणी तपासात सहकार्य न केल्याने सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) डीएचएफएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांना अटक केली आहे. मनी लाँड्रिंग चौकशी प्रकरणी ईडीने दिवान हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (DHFL) मुख्य व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांना अटक केली अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.

अधिकारी पुढे म्हणाले की, वाधवान चौकशीत सहकार्य करत नसल्याने मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर 2019 मध्ये सुरुवातीला ईडीने रणजित सिंग बिंद्रा आणि हारुण युसूफ या दलालांना अटक केली होती. त्यानंतर मिर्चीच्या मालमत्तेतील गैरव्यवहारांचा छडा लागला आहे. इक्बाल मिर्ची फरार होता. 2013 साली लंडनमध्ये निधन झाले. 1986 साली मोहम्मद युसूफ ट्रस्टच्या वरळीतील तीन मालमत्ता साडेसहा लाखांना विकत घेतल्या होत्या. त्याच्या मृत्यूनंतर त्या मालमत्ता 200 कोटी रुपयांनी विकण्यात आल्या. या व्यवहारात सनब्लिंकला रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने रणजित सिंग ब्रिंदा आणि हरुण युसूफ यांनी दलाली केली होती.

हे प्रकरण इक्बाल मिर्चीच्या मुंबईतील मालमत्तेशी संबंधित आहे. एकूण मालमत्तेतील तीन मालमत्ता सनब्लिंकला विकण्यात आल्या. सनब्लिंक ही कंपनी वाधवान बंधू कपिल आणि धीरज यांच्याशी संबंधित आहे. ईडीने मिर्ची आणि त्यांच्या कुटूंबातील सदस्यांसह इतरांविरोधात मुंबईतील महागड्या मालमत्तांच्या खरेदी विक्रीच्या गैरव्यवहारप्रकरणी मनी लॉंड्रिंग आरोपाअंतर्गत गुन्हा दाखल आहेत.

इक्बाल मिर्ची हा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात असल्याचे म्हणले जाते. इक्बाल मिर्ची विरोधात अंमली पदार्थांच्या तस्करी आणि खंडणीचे गुन्हे आहेत. 1993 च्या बॉम्बस्फोट फरार आरोपी इक्बाल मिर्चीचे 2013 साली लंडनमध्ये निधन झाले आहे. त्याच्या मालकीच्या मुंबईसह देशातील मिळकती असून हवालामार्फत त्यातून शेकडो कोटींचे गैरव्यवहार करण्यात आल्याचे ईडीच्या तपासातून स्पष्ट झाले. मिर्चीच्या वरळी येथील सीजे हाऊस तिसऱ्या, चौथ्या मजल्यावरील फ्लॅट, ताडदेव येथील अरुण चेंबर्स येथील कार्यालय, वरळीतील साहिल बंगल्यांतील तीन फ्लॅट, क्रॉफर्ड मार्केट येथील तीन दुकान, गाळे आणि लोणावळा येथील बंगला व भूखंड जप्त केले आहे. या सर्व मालमत्तेची किंमत अंदाजे 600 कोटी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.