दोन गटात तुंबळ हाणामारी, दोघे जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात परदेशी व गुजर या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना शहरातील अतिसंवेदनशील आझादनगर भागात काल (दि.18) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे घटना घडल्याच्या दिवशीच दुपारी नाशिक परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक छोरिंग दोर्जेनी यांनी जातीय सलोखा, शांतता राहावी याबाबत बैठक घेऊन मार्गदर्शन केले होते. त्यानंतर काही तासातच ही घटना घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, परदेशी व गुजर या दोन गटांमध्ये अनेक दिवसांपासून वाद आहेत. मध्यरात्री आझादनगर भागात दोन्ही गट एकमेकांसमोर आले. जुन्या वादावरून त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. लाठ्या, तलवारी तसेच गावठी कट्ट्याचाही वापर करण्यात आला. या हाणामारीत गुजर गटातील मंगल गुजर, आकाश हाके हे दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी परिस्थीतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सौम्य बळाचा वापर करण्यात आला. दोन्ही गटातील हाणामारी करणारे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.