संस्थाचालकास 25 लाखांची खंडणी मागणारा समाजवादी पार्टीचा जिल्हाध्यक्ष साथीदारासह पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षण संस्थांकडून 25 लाखांची खंडणी मागणाऱ्या समाजवादी पार्टीच्या जिल्ह्याध्यक्षासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुंडिलकनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडलं आहे. बुधवारी विद्यानगर येथील जागृत हनुमान मंदिराजवळ ही कारवाई करण्यात आली. अमितकुमार अनिलकुमार सिंग (28, रा. कुंज, ता ओहारी, पोलीस ठाणे नवादा, जि नावादा बिहार, ह. मु. नवकारयश सोसायटी, पोलीस कॉलनी, पडेगाव) व त्याचा साथीदार प्रशांत राम वाघरे (29, रा. लिंबगाव, ता नांदेड, ह. मु. नामदेव पवार यांच्या बिल्डींगमध्ये गोदावरी लॉनजवळ) अशी अटक करण्यात आलेल्या खंडणीखोरांची नावे आहेत.

नेमकं प्रकरण काय ?
सुनील पालवे (रा. अंबिकानगर, गारखेडा) यांच्या 11 शैक्षणिक संस्था आहेत. शैक्षणिक संस्थेची माहिती उघड न करण्यासाठी अमितकुमार सिंग 25 लाखांची खंडणी मागू लागला. त्याच्या खंडणी मागण्याने वैतागलेल्या पालवेंनी अखेर सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्याकडे धाव घेतली. या प्रकरणी सर्व खात्रीलायक माहिती त्यांनी जमा केली.

5 लाखांवर झाली तडजोड, पोलिसांनी रचला सापळा
25 लाखांची खंडणी मागणाऱ्या सिंग सोबत चर्चा करून 5 लाखांवर तडजोड करण्यात आली. पैसे देण्याच फायनल होताच पुंडलिकनगर पोलीस ठाण्यानं सापळा रचला. आरोपी सिंगच्या हातात 5 लाखांच्या नोटांचे बंडल असलेलं पाकिट देण्यात आलं. आरोपीला पैसे देताच तक्रारदारानं पोलिसांना इशारा केला. यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना रंगेहात पकडलं. यातील अमितकुमार सिंग हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात बेगमपुरा, जिन्सी इथे देखील गुन्हे दाखल आहेत.

सदर खंडणी प्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब मुळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश सांगळे, विठ्ठल फरताळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रवीण मुळे, दीपक जाधव, नितेश जाधव, पोलीस शिपाई आत्तार, शिवा बुट्टे, संतोष बोधक, स्वप्निल विटेकर यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे.

कागदी नोटांचे बंडल
दरम्यान 5 लाखांची रोकड मॅनेज करणं शक्य नव्हतं. त्यामुळे पोलिसांनीही शक्कल लढवली. 500 रुपयांच्या नोटांच्या आकाराच्या कागदाचे 10 बंडल तयार करण्यात आले आणि हीच 5 लाखांची रोकड असल्याचं भासवून दिलं. आरोपीनं बंद पाकिटातील 5 लाख स्विकारले. तक्रारदारानं डोळ्यावरील चष्मा काढला. हाच पोलिसांसाठी इशारा होता आणि अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.