आरोग्य विभागाचा खुलासा ! सध्या राज्यात फक्त 3 प्रयोगशाळांमध्ये ‘कोरोना’ची तपासणी, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून राज्यातील कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना सोशल मीडियावर कोरोना व्हायरसबाबत अनेक अफवा पसरवण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोना व्हायरसची चांगलीच धास्ती घेतली आहे. मात्र, योग्य उपचाराने हा रोग बरा होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. सध्या या रोगाची कोणतीही लस नसली तरी येत्या एक ते दीड वर्षात याची लस विकसीत करण्यात येईल असे काही वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

कोरोना व्हायरसबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसवण्यात येत आहे. त्यामध्ये कोरोना रक्त तपासणीसंदर्भात महाराष्ट्रातील विविध हॉस्पीटलची यादी सध्या व्हायरल होत आहे. या व्हायल होत असलेल्या मेसेजबाबत आरोग्य विभागाकडून खुलासा करण्यात आला आहे. राज्यात संशयित रुग्णाची कोरोना तपासणी करत असताना रक्ताची चाचणी घेतली जात नाही. त्या रुग्णाचा ‘नसो फॅरिंजियल स्वाब’ घेऊन प्रयोगशाळेत पाठला जातो. यासाठी महाराष्ट्रात सध्या फक्त तीन ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे. कोरोनाची तपासणी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा, पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्था आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात या रोगाची तपासणी करण्यात येते.

कोरोना संशयित रुग्णाचा स्वाब या तीन प्रयोगशाळेत पाठवला जातो. अजून काही दिवसांमध्ये ही सुविधा मुंबईतील केईएम, हाफकीन यासह चार ते पाच ठिकाणी सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली रुग्णालयाची यादी ही चुकीची आहे. तसेच रुग्णाच्या रक्ताची नाही तर स्वाबची तपासणी केली जाते. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.