अर्थसंकल्पावर संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले – ‘खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  नुकताच आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी 2021-22 या वर्षांचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा’, अशा शब्दांत टीका केलीय.

याअगोदर त्यांनी कोरोना कालावधीमध्ये व लॉकडाऊन दरम्यान सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प हा वेगळा होता. यावेळी कोणत्याही कागदपत्रांशिवाय टॅबच्या सहाय्याने हा अर्थसंकल्प मांडला.

सुरुवातीला आरोग्य खात्यामधील बजेट सादर करताना सुमारे 137 टक्क्यांची वाढ आरोग्य विभागाच्या बजेटमध्ये झालीय, असे त्यांनी सांगितलं.

संजय राऊत म्हणाले, केंद्र सरकार महाराष्ट्राचं देणं लागते. पण, महाराष्ट्राला काय दिलं?, त्यांच्या खिशात काय आहे?. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा, तसे हे दिल्लीचे बाजीराव.

महाराष्ट्राने देशाला सातत्याने देण्याची दानत दाखवलीय. पण, महाराष्ट्रावर कायम अन्याय झालाय. महाराष्ट्र देशाचं पोट भरतो. पण, महाराष्ट्राच्या पोटाकडे सरकार पाहत नाही. सध्या, आकड्यात पडायचं नाही, किती खरे-किती खोटे हे सहा महिन्यांनी कळतं. आता, आर्थिक थापा मारणं बंद केलं पाहिजे, सामान्य जनतेला पोटाची भाषा कळते. तरुणांना रोजगाराची भाषा कळते, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पातून काय मिळाले? असा सवाल उपस्थित केलाय.

पेट्रोलचे भाव आत्ता 100 रुपये लिटरपर्यंतो पोहोचलेत. आता, 1 हजार रुपये लीटर करून कायमचं मारायचं आहे का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केलाय.

तसेच, 1 हजार रुपये लिटर पेट्रोल झाल्यानंतर लोकं घरातून बाहेर पडणार नाहीत. पेट्रोल दरामुळे लॉकडाऊन होईल. लोकांनी घरात हरीभजन करत बसावं, असं वाटत असेल, असे म्हणत केंद्र सरकारच्या बजेटवर राऊत यांनी टीका केलीय.

महाराष्ट्रातील नागपूर मेट्रोसंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता, नागपूर आणि नाशिकला भाजपची सत्ता राहणार नाही. मुंबईची मेट्रो का रखडवली? केंद्राची जमीन आहे म्हणता, मंगळावरून आणली का चंद्रावरून?, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

मुंबई मेट्रो सुरू करून देण्याची मागणीही संजय राऊत यांनी केलीय. तसेच, बंगाल, तामिळनाडू, केरळसाठी विशेष तरतूद यावर बोलताना हा अर्थसंकल्प देशाचा आहे की राजकीय पक्षासाठीच्या निधीवाटपाचा?, राष्ट्रीय कोषातून निवडणुकांसाठी निधीवाटप सुरू आहे का? असे प्रश्नही खासदार संजय राऊत यांनी केले.

दरम्यान, भाजप नेत्यांकडून यंदाचा अर्थसंकल्प कशी रितीने चांगला आहे. गरिबांना आणि सर्वसामान्यांना किती फायदेशीर आहे?, हे सांगत आहेत. तर, विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केलीय.

पेट्रोल महागणार!, कृषी अधिभार आकारणार

केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी कृषी सेस आकारण्याची घोषणा केलीय. सध्या मुंबईत पेट्रोल 92.86 आणि डिझेल 83.30 रुपयांना लीटर इतके आहे. यावर हा सेस लागणार नसून तो कंपन्यांच्या ब्रँडेड पेट्रोल आणि डिझेलवर लागणाराय. यामुळे हा सेस कंपन्यांना द्यावा लागणार आहे. या दरवाढीचा परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार नाही, असे सांगितले जातेय. डिझेलवर 4 रुपये आणि पेट्रोलवर 2.5 रुपयांचा सेस लावला आहे. हा सेस ब्रँडेड पेट्रोल डिझेल म्हणजेच स्पीड, एक्स्ट्रा माईल अशा प्रमिअम इंधनावर लागणाराय. याचा अर्थ सरकारने कृषी क्षेत्रासाठी वेगळा फंड तयार करण्याचा प्रयत्न केलाय, असे समजते.