भाजपच्या डाॅ. सुजय विखेंना मतदान करायचे नाही ; भाजप खा. दिलीप गांधी समर्थक

खा. गांधीचे पुत्र सुवेंद्र गांधी लोकसभा लढविणार : 'पोलिसनामा'चा अंदाज तंतोतंत खरा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार यांना मतदान करायचे नाही, असा सूर खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यांचा सूर पाहून गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी जाहीर घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्या समोरील संकट वाढले आहे.

dilip-gandhi

खा. गांधी हे बंडाच्या पवित्र्यात असून, त्यांचे सुपुत्र लोकसभेची निवडणूक लढविणार, याबाबतचे वृत्त ‘पोलीसनामा‘ने प्रसिद्ध केले होते. सुवेंद्र गांधी यांच्या घोषणेमुळे सदरचेे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे. टिळक रस्त्यावरील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय येथे खा गांधी यांच्या समर्थकांची बैठक आयोजित केली होती. मात्र कार्यकर्त्यांनी एकदम टोकाची भूमिका घेतली आहे. उमेदवारी नाकारणाऱ्या भाजपाला लोकसभा निवडणुकीत मतदान करायचे नाही. कोणत्याही परिस्थितीत सुजय विखे यांना मतदान झाले नाही पाहिजे. त्यांचा पराभव झाला पाहिजे, असा मनोदय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी करावी, अशी मागणीही एका कार्यकर्त्यांनी केली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निश्चित झाल्याने तसे करता येणार नाही, असा सूर बैठकीत निघाला.

भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत म्हणून काम करतानाही पक्षाने अन्याय करून काँग्रेसमधून प्रवेश केलेल्या विखे यांना लोकसभेची उमेदवारी दिली. ज्या पक्षाने डावलले, त्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत मतदान करायचे नाही, अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. खा. गांधी समर्थकांच्या आक्रमक भूमिकेमुळे डॉ. सुजय विखे यांचे अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. विखे यांना पराभूत करायचे, अशी गांधी समर्थकांची भूमिका असल्याने विखेंसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

भाजप खा. दिलीप गांधी बंडखोरी करणार हे वृत्त पोलीसनामाने रविवारी सकाळी प्रकाशीत केले होते.

कार्यकर्त्यांच्या भाषणानंतर सुवेंद्र गांधी यांनी बोलताना पक्षाच्या विरोधात बंडखोरी करून लोकसभा निवडणूक लढविण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.