डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलला सांगलीत अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलला अखेर अटक करण्यात आली आहे. विटा तहसीलदार ऋषीकेश शेळके यांना मारहाण प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. वळूच्या पकडलेल्या वाहनांचा दंड रद्द करावा यावरून तहसीलदारांना मारहाण केल्यानंतर चंद्रहार पाटील फरार झाला होता. अखेर आटपाडी तालुक्यातील दिघंची परिसरातून चंद्रहारला आणि त्याच्या एका साथिदाराला अटक करण्यात आली. सोमवारी (दि.18) त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सांगलीच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि विटा पोलिसांनी ही संयुक्त अटकेची कारवाई केली. चंद्रहार पाटील आणि त्याचा साथीदार सागर श्रीमंत सुरवसे याने 3 मे रोजी विटा तहसील कार्यालयात मारहाण केली होती. या घटनेनंतर चंद्रहार फरार झाला होता. चंद्रहारला अटक करावी, यासाठी जिल्ह्यातील महसूलच्या अधिकाऱ्यांनी एक दिवस कामबंद आंदोलन केले होते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महसूल अधिकाऱ्यांनी संयमाची भूमिका घेत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आश्वासनानंतर काम सरु केले होते.

घटनेनंतर पंधरा दिवसांनी चंद्रहार पाटील याला अटक करण्यात आली आहे. आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे चंद्रहार येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार चंद्रहार आणि त्याचा साथीदार सागर सुरवसे याला अटक करण्यात आली. 3 मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास चंद्रहार पाटील आणि सागर सुरवसे यांनी तहसीलदार ऋषीकेश शेळके यांना मारहाण केली होती.

वाहनांवर केलेल्या कारवाईचा राग मनात धरून आणि वाहनांवर केलेला दंड रद्द करून वाहने सोडावीत अशी मागणी चंद्रहार पाटील करत होता. तहसील कार्यालयाच्या आवारात शेळके त्यांच्या शासकीय गाडीत बसत असताना या दोघांनी त्यांना अडवले. त्यांना गाडीच्या बाहेर ओढून मारहाण करण्यात आली होती. मारहाणीनंतर चंद्रहार पाटील व सागर सुरवसे पळून गेले होते. त्यांच्या शोधासाठी तीन पथके नेमण्यात आली होती.

जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी चंद्रहारच्या अटकेसाठी तीन पथके तयार करून त्याच्या अटकेच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांच्या पथकांनी कराड, सुर्ली, आटके, तासगाव, कुंडल व भाळवणी परिसरात शोध घेतला. परंतु ते सापडले नाहीत. अखेर रविवारी (दि.17) दोघांना अटक करण्यात आली.