ससूनचे अधिष्ठाता डॉ अजय चंदनवले यांची बदली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

ससूनचे कार्यक्षम अधिष्ठाता डॉ. अजय साहेबराव चंदनवाले यांची बदली मुंबईच्या जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदी करण्यात आली आहे. तर जे जे चे अधिष्टाता सुधीर ननंदकर यांची बदली कोल्हापूर सीपीआर येथे करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने हे आदेश तडकाफडकी काढले आहेत. मात्र या नवीन बदलीमुळे डॉ चंदनवले नाखूष असल्याचे कळते आहे.
डॉ चंदनवाले यांनी साडेसहा वर्षांपूर्वी ससून येथील अधिष्टाता पदाची सूत्रे हातात घेतली आणि ससूनचा कायापालट केला.केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहत औद्योगिक समूह, सामाजिक संस्था, देवस्थान यांच्याकडून तब्बल 50 ते 60 कोटीपेक्षा अधिक रुपयांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी जमा करून सासूनला विविध सुविधा दिल्या. यामध्ये सहा कोटीचा 59 बेडचा एन आय सी यु त्यांनी मिळवला. सी एस आर फंडाचा रुग्णालयासाठी चांगला उपयोग करता येऊ शकतो याचा त्यांनी इतर महाविद्यालयापुढे आदर्श घालून दिला आहे.

तसेच किडनी, लिवर ट्रान्सप्लांट सुविधा सुरू केल्या असून हृदय ट्रान्सप्लांट साठी परवानगी मागितली आहे. डॉ चंदनवाले यांची बदली वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या मर्जीने झाल्याचे समजते.