संभाजी मालिका बंद होणार ? अमोल कोल्हे म्हणतात…

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे शिरूर मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार अभिनेते अमोल कोल्हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यास स्वराज्य रक्षक संभाजी हि कोल्हेंची सध्या टेलिव्हिजन जगतात सुरु असलेली मालिका बंद होणार का या प्रश्नाचे उत्तर स्वतः अमोल कोल्हे यांनी दिले आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिका पूर्ण करूनच अभिनय क्षेत्रातून विश्रांती घेऊ असे अभिनेते अमोल कोल्हे यांनी म्हणले आहे.

शिवसेनेला जय महाराष्ट्र घालून डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अशात त्यांनी निवडणुकीच्या धामधुमीत हि संभाजी मालिकेच्या चित्रीकरणाला वेळ देण्याचे ठरवले आहे. एकीकडे राजकरण आणि एकीकडे अभिनय या दोन्ही बाबीमुळे डॉ. अमोल कोल्हे यांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे ते स्वराज्य रक्षक संभाजी मालिका संपल्यानंतर अभिनय क्षेत्रातून विश्रांती घेणार आहेत.

दरम्यान शिरूर लोकसभेसाठी अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या नावावर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आवाजी मतदान घेतले तेव्हा त्यांच्याच नावासाठी लोकांनी पसंती दिली. त्यामुळे लोकप्रियता असणारा चेहरा म्हणून अमोल कोल्हे यांची राजकारणात ओळख होऊ लागली आहे. या सर्व घडामोडीचा परिपाक म्हणून त्यांना शिरूर लोकसभेच्या जागेवर निवडणूक लढवण्याचे आदेश राष्ट्रवादी कडून दिले जाण्याची शक्यता आहे. तर शिरूर मधून अमोल कोल्हे यांनी निवडणूक लढल्यास खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या समोर तगडे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.