ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी ; राष्ट्रवादीत प्रवेश

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि त्रिपुरा, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त अंकुश काकडे यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्विकारले आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने कोल्हापूरसह महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.डी. वाय. पाटील यांचं शिक्षण क्षेत्रात मोठं नाव आहे. कोल्हापुरातल्या राजकारणातही त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. त्यांचे सुपुत्र सतेज पाटील यांचे राजकीय विरोधक मानले जाणारे धनंजय महाडिक हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत.

तर, सतेज पाटील हे काँग्रेसचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी त्यांचे चुलत भाऊ अमल महाडिक यांचा प्रचार केला होता. परिणामी सतेज पाटील यांचा पराभव झाला होता. त्यामुळे मुलाचा मुख्य विरोधक ज्या पक्षात आहे, त्याच पक्षात डॉ. डी. वाय. पाटील यांनी प्रवेश केल्याने कोल्हापूरसह महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

२००९ ते २०१३ या काळात डी. वाय. पाटील हे त्रिपुरा, तर २०१३ ते २०१४ या काळात बिहारचे राज्यपालही होते. याशिवाय, त्यांच्याकडे पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचाही कार्यभार काही काळासाठी होता. १९५७ ते १९६२ या काळात ते काँग्रेसकडून कोल्हापूरचे महापौर होते. १९६७ आणि १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत आमदार म्हणूनही निवडून गेले होते.

दरम्यान, डी वाय पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाने राष्ट्रवादीच्या वाढीस मतदच होईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.