ड्रग्स केस : राष्ट्रवादीचे दिग्गज आणि ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला NCB कडून ‘समन्स’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईमध्ये 200 किलो ड्रग्स जप्त केल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (एनसीबी) ठाकरे सरकारमधील कॅबीनेट मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. समीर खान यांचं लग्न नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांच्याशी झालं आहे. एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर खान आणि करन सजनानी यांच्यामध्ये 20 हजार रूपयांची घेवाण-देवाण झाली होती.

करन सजनानी आणि समीर खान यांच्यामध्ये गुगल पे व्दारे 20 हजार रूपयांचा व्यवहार झाला आहे. ड्रग्स संदर्भातच पैशांची घेवाण-देवाण झाल्याचा संशय एनसीबीला आहे. त्याचीच पडताणी करण्यासाठी एनसीबीनं समीर खान यांना बोलावलं आहे. ड्रग्स केस प्रकरणात एनसीबीच्या रडारवर अनेक जण आहेत. मंगळवारी एनसीबीनं मुंबईमध्ये मुच्छड पानवाला राजकुमार तिवारी याला अटक केली होती. सोमवारी एनसीबीनं मुच्छड पानवालाचे मालक जयशंकर तिवारी आणि राजकुमार तिवारी यांच्याकडे काही तास सखोल चौकशी केली होती.

राजकुमार तिवारी, जयशंकर तिवारीचा लहान भाऊ आहे. राजकुमार तिवारी आणि जयशंकर तिवारी हे दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू परिसर असलेल्या कॅम्प कॉर्नर येथे पान शॉप चालवतात. जयशंकर तिवारी आणि राजकुमार तिवारी हे 6-6 महिने पान शॉप चालवतात. त्याच्याच पान शॉपवर बॉलिवूड आणि कार्पोरेट जगतातील मोठया हस्ती पान खाण्यासाठी येत असतात.